लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : कल्याण व ठाणे येथून होणारी केडीएमटी व टीएमटी बसची वाहतूक बंद पाडण्याकरिता येथील बागे फिरदोस येथे एका रिक्षाचालकाने बसच्या मार्गात आपली रिक्षा आडवी घातली आणि चक्क बसची चावी काढून घेतली. रिक्षाचालक मोहम्मद हानीफ सलीम शेख व युसुफ सलीम शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.गेल्या काही दिवसांपासून शिवाजी चौकातून टीएमटी बसची वाहतूक सुरू झाली असून त्याविरोधात स्थानिक रिक्षाचालकांमध्ये असंतोष खदखदत आहे. सोमवारी दुपारी बागे फिरदोस येथे एका रिक्षाचालकाने आपली रिक्षा आडवी घालून टीएमटी बस अडवून त्यामधील प्रवाशांना बसखाली उतरवले. बसची चावी काढून घेतली, अशी माहिती बसचालक व वाहकाने दिली. त्यांनी या रिक्षाचालकाविरोधात निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी रिक्षाचालक मोहम्मद हानीफ सलीम शेख व युसुफ सलीम शेख यांना ताब्यात घेतले आहे.टीएमटी बसचालकाने दिलेल्या माहितीनुसार, एसटी स्थानकाजवळ टीएमटीचा थांबा असून त्यास रिक्षाचालकांचा विरोध आहे. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने रिक्षा अस्ताव्यस्त उभ्या केल्या जातात. परिणामी, टीएमटी बसला पुढे जाण्यास नेहमी अडथळा होतो. रिक्षाचालकांशी वादविवाद होतात. तीनचार दिवसांपासून काही रिक्षाचालक सकाळच्या वेळेस टीएमटी बस शिवाजी चौकापर्यंत पोहोचू न देता त्यांना वंजारपाटीनाका येथे वळवण्यास सांगत असल्याची तक्रार बसचालक-वाहकांनी केली. टीएमटीच्या बस शिवाजी चौकातून सुटत असल्याने तेथे बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांनी बस न आल्याबद्दल टीएमटी नियंत्रण कक्षाकडे तक्रारी केल्या आहेत. यापूर्वी केडीएमटीच्या नारपोलीकडून शिवाजी चौकात येणाऱ्या बसगाड्या रोखण्याकरिता काही रिक्षाचालकांनी त्यांच्या काचा फोडल्या होत्या. परिणामी, केडीएमसीच्या बस गोपाळनगर येथे, तर टीएमटी बस नारपोली पोलीस ठाणे येथे उभ्या राहत असल्याने प्रवाशांना तेथपर्यंत जाण्याकरिता आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
टीएमटी वाहतूक रिक्षाचालकाने रोखली
By admin | Published: May 09, 2017 1:06 AM