ठाणे : ठाणे परिवहनसेवेत बदली व रोजंदारीवर काम करणाऱ्या तब्बल ५३८ चालक आणि वाहकांना अखेर सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता टीएमटीचे कामगार आनंदित झाले आहेत.
ठाणे परिवहनची सेवा १९८९ मध्ये सुरू झाली. त्यानंतर, परिवहनच्या सेवेत १९९५ ते २००० या कालावधीत परिवहन समिती व महासभेने मंजूर पदांवर शासनमंजुरीच्या अधीन राहून चालक-वाहक या संवर्गात बदली-रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियमानुसार या कामगारांनी आपल्या सेवेतील २४० दिवस भरले असतील, तर त्यांना नियमानुसार कायम केले जाते. परंतु, ठाणे परिवहनसेवेमार्फत तशा स्वरूपाची कोणत्याही प्रकारे कार्यवाही केली नव्हती.
त्यामुळे यासंदर्भात टीएमटी एम्प्लॉइज युनियन या कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी औद्योगिक न्यायालयात गेली होती. त्यानुसार, या कामगारांना सेवेत हजर झाल्याच्या दिनांकापासून त्यांना २४० दिवस ज्या दिवशी पूर्ण होत आहेत, त्या दिनांकापासून कायम कर्मचाºयांप्रमाणे फायदे देण्यात यावेत, असा निर्णय देण्यात आला होता. या निर्णयाविरोधात ठाणे महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयानेही औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
त्यानंतर, युनियनच्या माध्यमातून वारंवार आयुक्तांकडे यासंदर्भात पाठपुरावा सुरू होता. तसेच याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक झाली होती. त्यानंतर, काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात झालेल्या बैठकीत या कामगारांना सेवेत कायम करण्याबाबतचा निर्णय झाला होता. त्यानुसार, शुक्रवारी झालेल्या महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर झाल्याने परिवहनमधील १९७ चालक आणि ३४१ वाहक असे मिळून ५३८ कामगारसेवेत कायम झाले आहेत.२००१ पासूनचे फायदे द्यासभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या कामगारांना २००१ पासूनचे फायदे देण्याची मागणी केली. तर, या कामगारांना सेवेत कायम करण्याबाबतचे विश्लेषण परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी केले. त्यानंतर, या कामगारांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मागील कित्येक वर्षे सुरू असलेल्या कामगारांच्या लढ्याला मोठे यश आले आहे.