मीरारोड - आदिवासी बांधवाना चांगले शिक्षण व रोजगार देण्यावर शासनाचा भर असून त्यांचे स्थलांतर थांबवण्यासाठी शासनाचे प्रयत्न असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी मीरारोड येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वस्ती गृहाच्या उदघाटन प्रसंगी दिली .
काशीमीराच्या मुन्शी कंपाउंड मध्ये शासनाच्या जागेत २० कोटी खर्च करून आदिवासी मुला - मुलीं साठी शासकीय वसतिगृह आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणी व पाठपुराव्याने उभारण्यात आले आहे . तळ अधिक ३ मजली इमारत असून ४९ हजार फुटांचे बांधकाम आहे. ७५ खोल्यां मध्ये ३३० पेक्षा जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था आहे . या शिवाय बहुउद्देशीय सभागृह , इन डोअर गेम्स साठी हॉल, भोजन कक्ष आदी सुविधा आहेत . मंगळवारी उदघाटन वेळी आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित , खासदार राजेंद्र गावित , आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , आयुक्त दिलीप ढोले , माजी नगरसेवक राजू भोईर , कमलेश भोईर , विक्रमप्रताप सिंह आदी उपस्थित होते. मंत्री गावित यांनी वसतिगृहची पाहणी करून काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या .
यावेळी मंत्री गावित म्हणाले कि , आदिवासीं विविध वस्तू बनवतात त्या खरेदी करण्याची जबाबदारी आदिवासी विकास विभाग घेईल. आदिवासींचे वनपट्टे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे . आदिवासींच्या मूलभूत समस्या दूर करण्यासह शिक्षण व रोजगार साठी प्राधान्य दिले जात आहे .
आदिवासींसाठी शिक्षण क्षेत्रात खूप काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी जुन्या आश्रम शाळाच्या नव्याने अद्यावत इमारती बांधण्याची गरज आहे. प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात वसतिगृह निर्माण व्हावे . शिक्षण झाल्यानंतर नोकरी करू इच्छिणाऱ्यासाठी मोठ्या शहरांच्या परिसरात तरी व पुरुषां साठी स्वतंत्र हॉस्टेल शासनाने उभारण्याची मागणी विवेक पंडित यांनी केली.
खासदार राजेंद्र गावित म्हणाले की, राज्याच्या कानाकोपऱ्यातुन मुंबईत आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. गरीब प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या वसतीगृहाचा फायदा होणार आहे.
आपल्या मतदार संघातील आदिवासी बांधव व पाड्यांचा विकास करण्यासाठी विविध कामे व निधीची मंजुरी मिळाली आहे . आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु झाल्याने यातून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन ते व त्यांचे कुटुंब प्रगत होतील याचा आनंद मोठा असल्याचे आ. सरनाईक म्हणाले .