डोंबिवली - पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर हे उद्यान मंगळवारी खुले केले जाणार आहे. विविध खेळणी, जॉगिंग ट्रॅक, व्हर्टिकल गार्डन आणि ओपन अॅम्पीथिएटर आदी मनोरंजनाच्या सुविधांनी सज्ज झालेल्या या उद्यानाला श्री गणेश मंदिर संस्थानाने कार्पाेरेट लूक दिला आहे. त्यामुळे या उद्यान पुन्हा बालगोपाळांच्या किलबिलाट सुरू होणार आहे.केडीएमसीने त्यांच्या अखत्यारीतील काही उद्याने सामाजिक संस्थांना विकसित करण्यासाठी दिली आहेत. यापैकी पूर्वेतील नेहरू रोडवरील महापालिकेचे छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी श्री गणेश मंदिर संस्थानकडे पाच वर्षांसाठी देण्यात आली आहे. हे उद्यान आबालवृद्धांना फेरफटका मारण्यासाठी तसेच तरुण व लहान मुलांच्या विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण मानले जाते. १९९० च्या दशकात याठिकाणी सुरू झालेली मोराची गाडी बाळगोपाळांसाठी विशेष आकर्षण होती. उद्यानातील मोराच्या गाडीची रपेट मारण्यासाठी लहानग्यांच्या रांगा लागत असत. पण काही वर्षांपासून पुरेशा देखभाल आणि दुरुस्तीअभावी ही गाडी बंद पडली होती. तसेच उद्यानातील खेळण्यांचीही वाताहत झाली होती. अखेर श्री गणेश मंदिर संस्थानाने पुढाकार घेत या उद्यानाचे नूतनीकरणाचे काम हाती घेऊ न उद्यानाला कार्पाेरेट लूक दिला. नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने मंगळवारपासून हे उद्यान खुले होत असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली. त्यामुळे बच्चेकंपनीला याठिकाणी उन्हाळी सुट्टीत मनसोक्त खेळाचा आनंद लुटता येणार आहे.मोराची गाडीऐवजी मिनी ट्रेन धावणार : नवा लूक लाभलेल्या उद्यानात आता मोराची गाडी पाहायला मिळणार नाही. त्याऐवजी बालगोपाळांसाठी अहमदाबादवरून विशेष मिनी ट्रेन आणण्यात आली आहे. उद्यानाला तीन प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. २८ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या उद्यानात २५ खेळणी आहेत. ३ ते ६, ६ ते ९ आणि ९ ते १२ अशा वयोगटांनुसार साजेशी खेळणी बसवण्यात आली आहेत. उद्यानात जॉगिंग ट्रॅक आहेच, त्याचबरोबर उद्यानाच्या भोवताली घातलेल्या संरक्षक भिंतीवर कार्टून्ससह अन्य छायाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. याठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने व्हर्टिकल गार्डनच्या माध्यमातून हिरवळीचा साज चढविला जाणार आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही असून ओपन अॅम्पी थिएटर आदी सुविधा येथे देण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आजपासून पुन्हा किलबिलाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 1:46 AM