ठाणे : लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांतून ८७ उमेदवारांनी ११४ नामनिर्देशनपत्रे (अर्ज) दाखल केली होती. त्यातील १२ उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले. आता उर्वरित ७५ जण रिंगणात आहेत. यातील प्रमुख पक्षांचे बंडखोर व अपक्ष उमेदवार यांनी १२ एप्रिल रोजी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. यातून किती जणांकडून उमेदवारी मागे घेतली जाईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात २९ उमेदवारांनी ३५ अर्ज दाखल केले असता, त्यातून चार उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरवण्यात आले. आता दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह या ठाणे मतदारसंघात अन्य नोंदणीकृत पक्षांचे १४ उमेदवार आणि अपक्ष ११ आदी २५ उमेदवार शिल्लक आहेत. यातून मते खाणाऱ्या अपक्षांसह पक्षातून बंडखोरी करणाºया उमेदवारांची मनधरणी करून त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी तयार करण्यात येत आहे. यासाठी काहींना लक्ष्मीदर्शनाचे आमिषही दाखवले जात आहे. यामध्ये किती यश मिळणार, याकडे आता लक्ष लागून आहे. याप्रमाणेच कल्याणमध्ये ३६ उमेदवार होते. यातून चार अवैध ठरले आहेत. तरीदेखील या मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह नोंदणीकृत पक्षांचे २२ उमेदवार आहेत. याशिवाय, १२ अपक्ष आहेत. यातील किती उमेदवार त्यांची उमेदवारी मागे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भिवंडीतही मुख्य लढत होणाºया दोन पक्षांसह नोंदणीकृत पक्षांचे १२ आणि १० अपक्षांची उमेदवारी होती. त्यातील चार अवैध ठरले आहेत. आता या १८ उमेदवारांपैकी भिवंडीतून किती जण उमेदवारी मागे घेणार, यासाठी चाचपणी सुरू आहे. यात बाळ्यामामा म्हात्रे आणि विश्वनाथ पाटील या बंडखोरांचा समावेश आहे.कल्याण मतदारसंघातून दोघांची माघारकल्याण लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी दोघा उमेदवारांनी माघार घेतली. यापूर्वी बुधवारी एकूण दाखल झालेल्या ३६ उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात चौघांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे आता मतदारसंघात ३० उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून, रिंगणात किती उमेदवार राहतात, हे चित्र स्पष्ट होणार आहे.देवेंद्र सिंह आणि सुरेश पाल अशी माघार घेतलेल्या अपक्ष उमेदवारांची नावे आहेत. सिंह हे भाजपचे समर्थक होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भरलेला अर्ज चर्चेचा विषय ठरला होता. अखेर, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी घेतलेल्या भेटीनंतर अर्ज मागे घेण्याचा निर्णय सिंह यांनी घेतला. त्यानंतर, गुरुवारी त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.