लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कोविडचे सर्व नियम पाळत दि. 4 ऑक्टोबरपासून पाचवी ते आठवी व माध्यमिक शाळा नववी ते बारावी आजपासून नियमित सुरू करण्याचे आदेश आहेत. मात्र पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुका 5 ऑक्टोबर रोजी होत आहेत, या पार्श्वभूमीवर बहुसंख्य शिक्षक निवडणूक कामावर असल्याने आज मतदान पेट्या घेऊन मतदान केंद्रावर जाऊन व्यवस्था पाहणे व उद्या म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याने मतदान केंद्रावर आपली कामे करण्याचे महत्वपूर्ण राष्ट्रीय काम असल्याने शिक्षक सदर कामात व्यस्त आहेत. परिणामी दोन दिवस शाळांना कुलूप असणार आहे. बहुसंख्य शाळात मतदान केंद्र आहेत.
माध्यमिक शाळेतील काही शिक्षक शाळेत आहेत. त्यामुळे माध्यमिक शाळात आजपासून किलबिलाट सुरू झाल्याचे ॲस्पी विद्यालय उचाट येथील शिक्षक विजय जोगमार्गे यांनी सांगितले. मात्र मुलांची उपस्थिती पन्नास टक्केपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले. वाड्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तेही निवडणूक कामात व्यस्त असल्याचे समजले.