ठाणे : ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाच्या मुख्य खांब उभारणीआड येणाऱ्या शास्त्रीनगर भागातील अतिक्रमणांवर मंगळवारी हातोडा पडणार आहे. परंतु, येथील काही रहिवाशांचे रेंटलच्या, तर काहींचे बीएसयूपीच्या घरात पुनर्वसन केले जात असल्याच्या मुद्यावरून सोमवारी येथील रहिवाशांनी घरांच्या चाव्या घेण्यास नकार दिला. २४० पैकी सुमारे १०० रहिवाशांनीच दिवसभरात चाव्या घेतल्या असून मंगळवारी यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून या अतिक्रमणांवरील कारवाईला राजकीय विरोधदेखील झाला होता. परंतु, तो हाणून पाडून मंगळवारपासून या अतिक्रमणांवर हातोडा टाकणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तिसऱ्या खाडीपुलाच्या खांब उभारणीच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय, खारेगाव भागातून मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरील बेकायदा बांधकामे हटवण्याची कारवाईदेखील मंगळवारीच केली जाणार आहे. ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या खाडीवर सध्या दोन पूल अस्तित्वात असून ब्रिटिशकालीन पुलाचे आयुर्मान संपुष्टात आल्याने त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. तरीही अनेकदा त्या पुलावरून दुचाकी गाड्या, काही हलकी वाहने बेकायदा नेली जातात. या जुन्या पुलाशेजारीच दुसरा खाडीपूल असून त्यावरून दोन्ही शहरांतील वाहतूक सुरू असते. उरण तसेच पनवेल येथून घोडबंदरमार्गे गुजरातला जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक याच पुलावरून सुरू असते. वाहनांची वाढती सख्या लक्षात घेता हा पूल दिवसेंदिवस अपुरा पडतो आहे. या पुलावरील वाहनांच्या संख्येमुळे गती मंदावते. रांगा लागतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कळवानाका आणि साकेत परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होऊ लागली आहे. या पुलावर वाहन बंद पडल्यास वाहतूक ठप्प होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने या खाडीवर तिसऱ्या खाडीपुलाच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. या पुलामुळे या भागातील वाहतूककोंडी सुटेल, असा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या पुलाच्या उभारणीसाठी कळवानाका, विटावा आणि साकेत भागात खांब उभारणीचे काम सुरू आहे. कळवा खाडीकिनारी भागात असलेल्या शास्त्रीनगर भागातून हा पूल जाणार आहे. मात्र, त्या ठिकाणी असलेली बेकायदा बांधकामे पुलाच्या कामास अडसर ठरू लागली होती. त्यामुळे ती हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. हा निर्णय महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घेतल्याने काही राजकीय पक्षांनी या भागातील मतांवर डोळा ठेवून कारवाईस विरोध केला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई रखडली होती. निवडणुका संपल्याने पालिकेने ती कारवाई पुन्हा हाती घेतली आहे.दरम्यान, कळवा खाडीपूल उभारणीच्या कामासाठी या भागातील २४० बांधकामे हटवण्याची कारवाई मंगळवापासून हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यात २४० पैकी १०० बांधकामधारकांचे बीएसयूपी आणि रेंटलच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यानुसार, सोमवारी चावीवाटपाचा कार्यक्रम पालिकेकडून सुरू होता. परंतु, काही रहिवाशांचे रेंटल आणि काहींचे बीएसयूपीमध्ये पुनर्वसन केले जात असल्याने रहिवाशांनी याला विरोध केला. दरम्यान, उर्वरित १४० जणांच्या पुनर्वसनाची प्रक्रि या सुरू असून लवकरच त्यावरदेखील तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. कळवा येथील शास्त्रीनगर भागातील बाधित बांधकामधारकांचे पुनर्वसन बीएसयूपीच्या घरांमध्ये करण्यात आले. परंतु, एकच घराचे अनेकांना वाटप केल्याने महापालिकेच्या घरांचे वाटप करण्यात आलेले नाही. यामुळे पुनर्वसन प्रक्रियेत गोंधळ असल्याचा आरोप महापालिकेवर होऊ लागला असून त्यासंबंधीचे संदेश समाजमाध्यमावर प्रसारित झाले आहेत. मात्र, असा काही प्रकार घडला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. (प्रतिनिधी)
तिसऱ्या खाडीपुलाआड येणाऱ्या २४० अतिक्रमणांवर आज हातोडा
By admin | Published: April 18, 2017 6:37 AM