ठाणे: आज मनसैनिकांनी कामगार आयुक्तांना घेराव घालून मराठी पाट्यांंसंदर्भात शेवटचा इशारा दिला. दुकानांबाहेर मराठी पाट्या लागल्या गेल्या नाही तर ५ जानेवारी २०१८ पासून सर्व महाराष्ट्र सैनिक याच आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन करून उपोषणाला बसतील असे या इशाºयात त्यांनी म्हटले. १५ दिवसांपुर्वी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यानंतर मनसे पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी दुकानाबाहेर मराठी पाट्या लावण्याचे पत्र दिले. ठाण्यात मनसे पदाधिकाºयांनी शहरातील ५०० दुकानदारांना पत्र दिले आणि १५ दिवसांची मुदत देण्यात आली. दुकानांबाहेर मराठी पाट्या न लावल्यास खळ्ळखट्याकवर ठाम राहू असे मनसेकडून सांगण्यात आले. त्याआधी कामगार आयुक्तांना घेराव घातला जाईल असा इशारा ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला होता. त्यानुसार आज दुपारी मनसेचे जवळपास ७० पदाधिकारी-कार्यकर्ते कामगार आयुक्तांना भेटण्यास गेले होते. या भेटीत एका महिन्याच्या आत ठाणे शहरासह, संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पाट्या मराठीत झाल्या नाहीत व मुजोरांवर कारवाई करण्यात आली नाही तर आजपासून एका महिन्यानंतर महाराष्ट्र सैनिक याच आयुक्त कार्यालयात धरणे आंदोलन करून उपोषणाला बसतील असे कडक शब्दांत कामगार आयुक्तांना सांगत यावेळी कर्नाटकच्या आधारकार्डची त्यांना प्रत दाखवून महाराष्ट्रात आपल्या भाषेचा अभिमान का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तुम्ही मराठी अधिकारी आहात, तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत, त्यामुळे शहरासह, जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याच्या नोटीसा द्या असे कामगार आयुक्त देशपांडे यांना मनसे पदाधिकाºयांनी सांगितले. तसेच, तुमच्या नोटीशीनंतर मराठी पाट्या लावल्या गेल्यास आम्ही स्वत: येऊन तुमचा सत्कार करु असे ठाणे जिल्हा अध्यक्ष जाधव यांनी त्यांना सांगितले. यावेळी त्यांनी कोपरीतील उत्पादन शुल्क अधिकाºयांचा सत्कार केल्याचे उदाहरण दिले. यावेळी कामगार आयुक्तांनी नोटीसा देण्यात येईल असे आश्वासन मनसे पदाधिकाºयांना सांगण्यात आले. तसेच, गुमास्ता परवान्याच्या नुतनीकरणावेळी त्या दुकानाच्या फलकाचे छायाचित्र जोडले जावे असा उपाय देखील मनसेने त्यांना सुचविला. यावेळी जाधव यांच्यासह मनविसे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, ठाणे शहराचे उपाध्यक्ष रवी मोरे, उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण, उपशहर अध्यक्ष विश्वजीत जाधव, महिला ठाणे शहर अध्यक्ष रोहिणी निंबाळकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठी पाट्यांसदर्भात आज मनसेचा कामगार आयुक्तांना घेराव, दिला शेवटचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 5:37 PM
आज दुपारी कामगार आयुक्तांना मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट घेऊन आयुक्त कार्यालयात उपोषणाला बसण्याचा शेवटचा इशारा दिला.
ठळक मुद्दे कामगार आयुक्तांना घेराव घालून मराठी पाट्यांंसंदर्भात शेवटचा इशारा५ जानेवारी २०१८ पासून सर्व महाराष्ट्र सैनिक धरणे आंदोलन करून उपोषणाला बसण्याचा इशारा नोटिशीनंतर मराठी पाट्या लावल्या गेल्यास कामगार आयुक्तांचा सत्कार