अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेल्या वर्षी १३ मार्च रोजी ठाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर कोरोनाचा जो कहर सुरू झाला त्यात अनेकांचे प्राणही गेले आहेत. आज वर्ष उलटले असून सुरुवातीला सापडलेल्या रुग्णांवर उपचार कसे व कोणत्या प्रकारचे करावेत याची कोणतीही माहिती आरोग्ययंत्रणेकडे नव्हती. परंतु, आज वर्ष उलटल्यानंतर कोरोनारुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे.
पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्ययंत्रणेसह जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांची उपाययोजनांसाठी धावपळ सुरू झाली होती. काय करावे याचा अभ्यास सुरू होता. यामुळे धावत्या ठाणे शहरासह संपूर्ण जिल्हा थांबला. दररोज मोठ्या प्रमाणात वाढणारे रुग्ण आणि या आजाराने होणारे मृत्यू यांच्यात होणारी वाढ. रुग्णालयांतील अपुरी पडणारी बेड्सची संख्या, रुग्णवाहिकांअभावी रस्त्यावर पडून रुग्णांची होणारी फरफट या सर्व गोष्टींना वर्ष पूर्ण होऊनही आजही ते प्रसंग आठवले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे. शासनाकडून केलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात अटकाव केलेल्या कोरोनाने आता पुन्हा आपले डोके वर काढल्याने या आजाराची वर्षपूर्ती होऊनदेखील त्याची धग अजूनही कायम आहे.
औषधांचा साठा पुरेसाकोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगून तिचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा सज्ज असून सर्व रुग्णालयांत पुरेसा औषधसाठा असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध असल्याचा दावा केला आहे.
पहिला पॉझिटिव्ह काय करतोयपहिला पॉझिटिव्ह आज नेहमीचे आयुष्य जगत आहे. परंतु, कोरोना झाल्यानंतर जगण्यामध्ये, खाण्यापिण्यामध्ये त्याने बदल केलेले आहेत. तसेच मास्क वापर, सॅनिटायझरचा वापर आजही तो करीत आहे. तसेच सध्या कामावर जात असून, घरी आल्यानंतरही तो पूर्वीसारखीच काळजी घेत आहे.
कोविड सेंटर पुरेसेठाणे महापालिका हद्दीत यापूर्वी महापालिकेची आणि खाजगी मिळून ३४ कोविड सेंटर सुरू होती. परंतु, मधल्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याने यातील अनेक सेंटर बंद करण्यात आली. मात्र, आता महापालिकेचे ग्लोबल कोविड सेंटर हे एक हजार ३०० बेडचे असून, ज्युपिटर रुग्णालयाजवळ असलेले कोविड सेंटरही आता सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी अकराशेहून अधिक बेड आहेत. तर बोरीवडे येथील कोविड सेंटरही सुरू करण्यात येत आहे. याशिवाय वेळ पडल्यास खाजगी रुग्णालयांनादेखील पुन्हा कोविड रुग्णालये म्हणून घोषित करण्याची तयारी केली आहे. चार ते पाच खाजगी रुग्णालये आजही कोविड सेंटर म्हणूनच सुरू आहेत. या सर्व ठिकाणी आजही बेड उपलब्ध आहेत.