कल्याण : स्वीकृतपद निवडीसाठी बुधवारी १० फेब्रुवारीला कल्याण डोंबिवली महापालिकेची विशेष महासभा होणार आहे. इच्छुकांना शुक्रवारपासून अर्ज देण्यास प्रारंभ झाला असून मंगळवारी अखेरच्या दिवसापर्यंत एकुण ७५ अर्जांचे वितरण सचिव कार्यालयातून झाले.३ फेब्रुवारीपासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांपासून ते माजी नगरसेवक, शिक्षण मंडळ आणि परिवहन समितीच्या माजी सदस्यांनी स्वीकृतसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून यापैकी कोण उमेदवारी दाखल करतो? याकडे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र महानगरपालिका नियम २०१२ च्या कायदयानुसार या पदासाठी महापालिकेच्या प्रशासकीय कामाचा अनुभव बंधनकारक केला असून याचा दांडगा अनुभव असलेल्या माजी प्रशासकीय अधिकाऱ्याबरोबरच शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, इंजिनीअर आणि नोंदणीकृत अशासकीय संघटनेचा पदाधिकारी यांची या पदावर वर्णी लावण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आल्यामुळे राजकीय पक्षांकडुन नियमानुसार सदस्य पाठविले जातात की नियमांकडे दुर्लक्ष केले जाते हे पाहण देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. तौलनिक संख्याबळ पाहता शिवसेना आणि भाजपा प्रत्येकी २ तर मनसेचा १ सदस्य असे ५ सदस्य स्वीकृतपदी निवडले जाणार आहेत. परंतु, उमेदवारी अर्ज घेण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षही मागे राहीलेले नाहीत. राजकीय पक्षांकडून हे सदस्य दिले जाणार असले तरी महापालिका आयुक्तांच्या शिफारशीनुसारच यासंदर्भातील कार्यवाही पार पडणार आहे. शुक्रवारपासुन सचिव कार्यालयातून अर्जांचे वितरण सुरू झाले होते. यात ६० इच्छुकांनी एकुण ७५ अर्ज नेल्याची नोंद झाली आहे. ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत आयुक्तांच्या दालनात हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर १० फेब्रुवारीला पात्र उमेदवारांची नावे स्वीकृत सदस्य म्हणून घोषित केली जाणार आहेत.
स्वीकृतसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: February 03, 2016 2:13 AM