ठाणे : आपने दिल्लीत राबवलेल्या उपक्रमाच्या धर्तीवर ठाण्यात आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्याचा संकल्प सत्ताधाऱ्यांनी केला आहे. यासाठी १६० कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी, ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या दोन दवाखान्यांची अवस्था अतिशय दयनीय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशातच आता आणखी ५० दवाखाने ठाण्याच्या विविध भागांत कार्यरत होणार आहेत. या उपक्रमातील तिसºया दवाखान्याचे प्रातिनिधिक लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. हा दवाखाना घोडबंदर भागातील ओवळा या गावात सुरू करण्यात येणार आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आणण्यात आली आहे. त्यानुसार, प्रायोगिक तत्त्वावर असलेल्या या दोन दवाखान्यांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. परंतु, या दवाखान्यांना काही दिवसांतच अवकळा आली. पहिले दोन प्रयोग फसले असतानाही शहराच्या विविध भागांत १६० कोटी खर्च करून ५० आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहेत. वास्तविक पाहता या दवाखान्यांसाठी पालिकेच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु, त्याला प्रतिसाद मिळत नव्हता.
आता मात्र निविदा अंतिम झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यानुसार, या योजनेचा शुभारंभ केला जात असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ओवळा येथील आपला दवाखान्याचा ई-लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. उर्वरित दवाखाने महिनाभरात शहराच्या विविध भागांत सुरू केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण इतिहास व जीवनप्रवासाची सर्वसमावेशक माहिती तरुण पिढीला कायमस्वरूपी उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे, त्यांचा जीवनप्रवास, त्यांचे वैयक्तिक व प्रासंगिक फोटो, त्यांची गाजलेली भाषणे, पुस्तके व भाषणाच्या सीडी आदींचा संग्रह येथे राहणार आहे. महापौर नरेश म्हस्के यांच्या कल्पक संकल्पनेतून हे स्मारक ठाणे महापालिकेने उभारले आहे. याशिवाय, क्लस्टर योजनेचे भूमिपूजनही यावेळी करण्यात येणार आहे.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणाºया या कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या पथदर्शी विकासाच्या ठाणे या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हबचे ई-उद्घाटन व संकेतस्थळाचे अनावरणही यावेळी करण्यातयेणार आहे.महापालिकांच्या नागरी सुविधांचे सुसूत्रीकरण व्हावे तसेच पालिकेचे दैनंदिन कामकाज प्रभावी व्हावे, यासाठी महापालिकेने अद्ययावत अशा कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरची निर्मिती केली असून या माध्यमातून महापालिकेच्या जवळपास ५० पेक्षा जास्त सुविधांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे.
कमांड सेंटरचे ई-उद्घाटन, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत खाडीकिनारा विकास प्रकल्पाचे ई-भूमिपूजन, घनकचºयापासून वीजनिर्मिती तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ८०० मेट्रीक टनापासून १२ मेगावॅट वीज तयार करण्याचा प्रयत्न राहणार आहे. या प्रकल्पाचे ई-भूमिपूजन, बांधकाम व तोडफोड कचरा पुन:प्रक्रिया केंद्राचे ई-लोकार्पण, शहरी वनीकरण प्रकल्प तसेच विज्ञान केंद्र प्रकल्पाचे ई-भूमिपूजन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
बीएसयूपी घरांचे चावीवाटप होणार
बीएसयूपीमधील घरांचे चावीवाटप, प्रकल्पबाधित तसेच दिव्यांगांना सदनिकांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप तसेच स्टॉलचे वाटप करण्यात येणार आहे. अनाथ, निराधार, निराश्रित बालके तसेच एचआयव्हीबाधित पालकांची मुले यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतीची तरतूद असलेल्या योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात अनुदान यावेळी दिले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी चोख व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.