उल्हासनगर : महापालिकेच्या उसाटने गाव हद्दीतील डम्पिंग ग्राउंडबाबत मंगळवारी दुपारी आयुक्तांनी बैठक बोलावली आहे. बैठकीला स्थानिक नागरिक व आमदार गणपत गायकवाड यांना आमंत्रित केल्याची माहिती उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली असून, या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
उल्हासनगरात डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, तत्कालीन आयुक्तांनी डम्पिंगसाठी राज्य शासनाकडे पर्यायी जागेची मागणी केली. अखेर शासनाने शहराजवळील एमएमआरडीएच्या ताब्यातील उसाटने हद्दीतील ३० एकर जागा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दिली. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे गेल्या तीन वर्षांपासून डम्पिंगसाठी हस्तांतरित झालेल्या जागेला कुंपण अथवा संरक्षण भिंत बांधलेली नाही. दरम्यान, महापालिका उपायुक्त मदन सोंडे हे पोलीस संरक्षणात संबंधित अधिकाऱ्यांसोबत जागेची मोजणी व संरक्षण भिंत बांधण्याच्या उद्देशाने गेले होते. पहिल्या वेळी स्थानिक नागरिकांनी विरोध करून पालिका अधिकाऱ्यांना व पोलिसांना पिटाळून लावले. दुसऱ्या वेळी गावकऱ्यांसह आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध केल्याने महापालिका अधिकारी खाली हाताने परत आले.
महापालिकेच्या उसाटने गाव हद्दीतील डम्पिंगला स्थानिकांसह आमदार गायकवाड यांनी विरोध केल्याने, शिवसेना व शहरातील नागरिकांनी आमदार गायकवाड यांच्या भूमिकेचा निषेध केला. शिवसेनेने कॅम्प नं. ५ येथील खडी खदान येथील डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाल्याचे व परिसरातील नागरिकांचे आरोग्य आल्याचे सांगून डम्पिंग हटविण्याची मागणी केली. या प्रकाराने शहरातील भाजप-शिवसेना आमने-सामने उभी ठाकली. उसाटने गाव हद्दीतील डम्पिंगचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आयुक्त डॉ. दयानिधी यांनी स्थानिक नागरिक व आमदार गणपत गायकवाड यांना निमंत्रित करून मंगळवारी दुपारी बैठक बोलावल्याची माहिती उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली.
..............
शासनाचा निधी परत जाण्याच्या मार्गावर
उसाटने येथील डम्पिंग ग्राउंड विकासाबाबत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे. डम्पिंगचा प्रश्न निकाली लागला नाही, तर निधी परत जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.