मुंबई : ठाणे जिल्हा परिषद, पाच पंचायत समित्या, तसेच दहा नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी (बुधवारी) मतदान होणार आहे. याशिवाय, मुंबई महापालिकेतील भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होईल. या निवडणुकांसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ जागांपैकी ५२ जागांसाठी १५२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर, खोणी विभागाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर, शहापूर (जागा २८), मुरबाड (१६), कल्याण (१२), भिवंडी (४२) आणि अंबरनाथ (८) या पाच पंचायत समित्यांच्या एकूण १०६ जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी २९७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीसाठी ७ लाख ३ हजार ३७८ मतदार असून एकूण ९३७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, वाशीम जिल्हा परिषदेच्या पांगरी नवघरे येथील रिक्त पदासाठीदेखील आज मतदान होईल. या एका जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व ठिकाणी गुरुवार, १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.पालघरला १७ तारखेलावाडा (पालघर), शिंदखेडा (धुळे), फुलंब्री (औरंगाबाद) आणि सालेकसा (गोंदिया) या नगरपंचायतींच्या सदस्यपदांसह अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होईल. तर, पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेसाठी १७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेसह १० नगरपरिषदांसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:29 AM