लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आताच्या काळात माझ्यासमोर जे साहित्य येते त्यात आजच्या काळातील साहित्य आणि नाटककारांचे चिंतन मला त्यात दिसत नाही. आजच्या लेखकांना हा काळ कळत नाही, हे कारण असू शकेल. कदाचित हा केवळ लेखकांचा दोष नसेलही. राजकारण, अर्थकारण किंवा समाजाची घडण ज्या कालखंडात घडते त्याचा प्रभाव त्यावर पडतो. त्यामुळेही असे होत असावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार, लेखक निळू दामले यांनी ‘ठाणे साहित्य महोत्सवा’त मांडले.
कोरम मॉलमध्ये शनिवारी सकाळी शं. ना. नवरे सांस्कृतिक मंचावर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ज्येष्ठ पत्रकार व लेखक निळू दामले, अभिनेते मंगेश देसाई, ख्यातनाम समीक्षक व लेखक डॉ. अनंत देशमुख, जेव्हीएम स्पेसचे संचालक मंथन मेहता, कोरम मॉलचे प्रमुख विकास लध्धा, ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, ‘लोकमत’चे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी या मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून कविवर्य कुसुमाग्रज ग्रंथ दालनातील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
तरुणांच्या हातात त्यांचा काळ राहिलेला नाही तरुण लेखक आपल्याला लिहिताना दिसतात; पण, मला सध्याच्या तरुणांबद्दल दया वाटते. ज्या काळात तरुण सापडलेले आहेत, तो काळ त्यांच्या हातात राहिलेला नाही. या काळाशी कसे जुळवून घ्यावे, हेच तरुणांना समजत नाही. तरुण भारताचे भवितव्य आहे, असे बाेलण्याची फॅशन असली, तरी मला हे भवितव्य फार कठीण दिसते. याचे कारण ज्या पद्धतीने विविध प्रश्नांना तरुण पिढीला तोंड द्यावे लागते, हे प्रश्न यापूर्वी नव्हते.
१९९० नंतरचे जग आणि त्यापूर्वीचे जग यामध्ये जमीन - अस्मानाचा फरक आहे. जुन्या गोष्टी वाचून आणि मंथन करून माणसाला काही उपयाेग होईल, अशीही आजची स्थिती नाही. तुमचे-आमचे जगणे तुमच्या आमच्या हातात नाही. आपली पोरं आणि आई-बाप आपल्या हातात नाहीत, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा अंदाज अजून कोणाला आलेला नाही.
सगळे विचारवंत थकले आहेत. अशा परिस्थितीत तरुणांबद्दल मला दया येते. काहीतरी करून त्यांनी यातून बाहेर पडावे, असे वाटते. वाचनासारख्या गोष्टीकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. त्यांच्या डोळ्यासमोर एक कोटी आणि दहा लाखांची पॅकेजेस् असतात. त्यांना एक कोटीचे काय करायचे हेच समजत नाही. फ्रान्समध्ये ५६ टक्के लग्न मोडतात. भारतामधील तरुण पिढीत घटस्फोटाचे प्रमाण २० टक्के आहे. पैसे मिळवायचे आणि भांडायचे. हे पैसे कोणावर खर्च करायचे, काय करायचे, असे खूप प्रश्न आहेत. या जीवनसंघर्षात तरुणांचे वाचनाकडे दुर्लक्ष झाले तर त्यात काही नवल नाही, असेही ते म्हणाले.