मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेनेच्या भीमसेन जोशी कोरोना रुग्णालयात अस्वच्छताचे साम्राज्य पसरले आहे . आधीच स्वच्छता गृहांची संख्या अत्यल्प असताना आहेत ती देखील घाणीने तुंबलेली व अस्वच्छ असल्याने कोरोना रुग्णांसह नागरिकां मध्ये नगरसेवक आणि प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत आहे.
पालिकेने भाईंदरचे भीमसेन जोशी रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून वापरात आणले आहे. येथे तिसऱ्या मजल्या पर्यंत कोरोनाचे रुग्ण ठेवले जात आहेत. त्यांच्यावर उपचार केले जातात. येथे जेमतेम 20 आयसीयू व व्हेंटिलेटर आहेत. सध्या रुग्णालयात कोरोना रुग्णां करीता सुमारे 250 खाटा आहेत.
प्रत्येक मजल्यावर जेमतेम तीन स्वच्छता गृह असून कोरोनाचे रुग्ण सार्वजनिक रित्या याचा वापर करतात. परंतु सुरवाती पासूनच स्वच्छता गृह विरोधात रुग्णांच्या तक्रारी आहेत. कधी स्वच्छता गृह बंद ठेवली म्हणून तर कधी ती तुंबलेली वा घाणीने भरलेली आहेत.
वास्तविक पालिकेने रुग्णालयातील साफसफाई साठी ठेकेदार नेमलेला असून तब्बल 70 कर्मचारी हाऊस किपिंग चे असताना देखील साफसफाई मात्र होत नाही. त्यातच चॉकप होण्याचे प्रकार असतात. यामुळे रुग्णांची गैरसोय तर होतेच पण अस्वच्छता पसरून दुर्गंधी सर्वत्र असते. रुग्णांनाच अस्वच्छतेला सामोरे जाऊन गैरसोय होत असताना दुसरीकडे नगरसेवक व प्रशासन मात्र दुर्लक्ष करत ठेकेदारास पाठीशी घालण्यात धन्यता मानतात. यामुळे रुग्ण आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान आयुक्त डॉ विजय राठोड यांच्या पर्यंत सदर प्रकार गेल्या नंतर स्वच्छता गुहांची सफाई करण्यात आली असल्याचे महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी सांगितले.