लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसचा आता वापर करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. त्यानुसार या भंगार बसचे रुपांतर सुसज्ज अशा शौचालयात केले जाणार असून त्याचा वापर महिलांना करता येणार आहे. या संदर्भातील निविदा ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने नुकतीच प्रदर्शित केली आहे. यात संबधींत ठेकेदाराने ती बस विकत घ्यायची असून त्यावरील येणारा खर्च देखील त्यालाच करावा लागणार आहे. या बदल्यात ठेकेदाराला ज्या ठिकाणी बस लावली जाणार आहे, तेथील २० टक्के परिसर वापरण्याचे अधिकार असणार आहेत.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील ९०० शौचालयांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार हे काम ८० टक्यांच्या आसपास झाले आहे. त्यानंतर आता शौचालय सफाईची मोहीम देखील महापालिकेने हाती घेतली आहे. तर स्वच्छ शहराचा एक भाग म्हणून ठिकठिकाणी नव्याने शौचालय उभारण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. याशिवाय मोबाइल टॉयलेट, कंटेनर टॉलयेल आदी संकल्पना देखील महापालिकेच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. त्यातही गर्दीच्या ठिकाणी किंवा हायवे लगत महिलांसाठी शौचालय उभारणीला देखील प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार आता आता परिवहनच्या भंगार बसचा वापर आता शौचालयांसाठी केला जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे.
त्यानुसार पहिल्या टप्यात २ बस यासाठी घेतल्या जाणार आहेत. या संदर्भातील निविदा पालिकेच्या घनकचरा विभागाने काढली आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केला जाणार आहे, अत्याधुनिक स्वरुपाचे हे शौचालय उभारले जाणार आहे. या शौचालयांचा वापर केवळ महिलांसाठीच करता येणार आहे. एका बसमध्ये पाच सीट्स असणार असून दोन बसमध्ये १० सीट्स असणार आहेत. यापूर्वी पूण्यात हा प्रयोग करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आता ठाणे महापालिकेने हा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार पीपीपी तत्वावर हा प्रयोग राबविला जाणार असून यात बेबी फिडींग आणि चेंजीग रुमही असणार असल्याचे पालिकेने सांगितले. ठाण्यातील सॅटीस पुलाखाली आणि गोल्डन डायज (माजिवडा) याठिकाणी हे दोन शौचालय उभारले जाणार आहे. या शौचालयांच्या माध्यमातून महापालिका संबधींत ठेकेदाराकडून जागेच्या रेडी रेकनर दराप्रमाणे भाडे आकारणार आहे. तर ठेकेदाराला येथील २० टक्के जागा ही स्वत:च्या वापरासाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच हे शौचालय पे अॅण्ड युज या तत्वावर वापरले जाणार आहे.
मोबाइल टॉयलेटठाणे महापालिकेच्या माध्यमातून ५५ लाख खर्चून मोबाइल टॉयलेट खरेदी करणार आहे. यातून ४ मोबाइल टॉयलेट घेतले जाणार असून त्याची निविदा देखील काढण्यात आली आहे. हे मोबाइल टॉयलेट, सभा, कार्यक्रम आदी ठिकाणी वापरले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा विभागाने दिली.