सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : भिवंडी-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पडघा येथील रस्त्यांच्या साईड पट्टीचे व सेवा रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा. असे निर्देश देत पडघा येथील टोलनाक्यावरून आज रात्रीपासून टोल वसुली सुरू करण्याचे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज ठरविण्यात आले.
प्राधिकरणाने येथील अंडरपास व इतर कामेही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, तहसीलदार अधिक पाटील, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे नाशिक विभागाचे प्रकल्प संचालक बाळासाहेब साळुंके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह संघर्ष समितीचे सदस्य विष्णू शिंदे, श्रीकांत गायकर आदि उपस्थित होते.
मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा येथील रस्त्याच्या संदर्भात यापूर्वीही बैठक आयोजित करण्यात आली होती. खडवली नाका येथे झालेल्या अपघातानंतर रस्त्याची कामे वेगाने करण्यासाठी शिनगारे यांनी सूचना दिल्या होत्या. आज सकाळी पुन्हा बैठक घेऊन या रस्त्याचे काम करणाऱ्या राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कामे तातडीने सुरू करून लवकरात लवकर संपविण्याच्या सूचना त्यांनी आज दिल्या. या मार्गावरील पंक्चर बंद करण्यात आले असून आता साईड पट्टीचे काम सुरू करण्यात येणार आहे एक महिन्यात ते पूर्ण केले जाणार आहे. अंडर पासचे काम पुढील सहा ते आठ महिन्यात पूर्ण करणार असल्याचेही यावेळी प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले. तर आज रात्रीपासून पडघा टोलनाक्यावर टोल वसुलीला सुरुवात करण्याचा यावेळी निर्णय आजच्या या बैठकीत घेण्यात आला.