कल्याण : कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरी व काँक्रिटीकरण सुरू असल्याने या मार्गावरील काटई टोलनाक्यावरील अवजड वाहनांसाठीची टोलवसुली बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. टोलवसुली बंद करण्याची मागणी कल्याणचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने काटईनाका येथील टोलनाका इगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला चालविण्यास दिला आहे. या टोलनाक्यावर हलक्या वाहनांकडून टोलवसुली बंद होती. मात्र, अवजड वाहनांकडून टोलवसुली सुरू होती. सध्या भिवंडी-कल्याण-शीळ या रस्त्याच्या सहापदरी व काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. त्यात काटई टोलनाक्यावर अवजड वाहने टोलसाठी थांबत होती. त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडत होती. ही कोंडी टाळण्यासाठी हा टोलनाका बंद करण्याची मागणी शिंदे यांनी राज्य सरकारकडे केली होती.
कल्याण-शीळ रस्ता हा नवी मुंबई, मुंबई, पनवेल, ठाणे आदी ठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. काटई येथील टोलनाका बंद करून तेथील टोलवसुली बूथही काढून टाकावेत, अशी मागणी खा. शिंदे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
निळजे येथील धोकादायक असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाची डागडुजी करून तोही अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका केल्याप्रकरणी खासदारांनी नगरविकासमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
----------------