कल्याण - शहरातील आचार्य अत्रे रंगमंदिराचा पडदा दीड वर्षाच्या देखभाल दुरुस्तीनंतर १ आॅक्टोबरला उघडण्यात येणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी चाचणीचा प्रयोग होणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेतर्फे सकाळी नृत्य, नाट्य, गायन व सांगीतिक कार्यक्रम होणार आहे.केडीएमसीने दुरुस्तीसाठी १ एप्रिल २०१७ ला अत्रे नाट्यगृह बंद केले होते. मात्र, अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर या रंगमंदिराचे रूपडे पालटले आहे. २८ आॅगस्टला अभिनेते, दिग्दर्शक व नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे, तर त्यांच्यानंतर महापौर विनीता राणे व शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी यांनीही रंगमंदिराची पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता. काम जवळपास पूर्ण होत आल्याने १ आॅक्टोबरला केडीएमसीच्या वर्धापनदिनी हे नाट्यगृह रसिकांसाठी खुले करण्याचा निर्णय राणे यांनी घेतला. त्यादृष्टीने रंगमंदिराच्या व्यवस्थापनाने तारखांचे वाटपही सुरू केले.दरम्यान, शुभारंभाच्या आधी २७ सप्टेंबरला चाचणी प्रयोग होणार आहे. या वेळी नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेतर्फे कार्यक्रम होणार आहेत. त्यात शहरातील सर्व अग्रगण्य नृत्य, नाट्य, गायन संस्थांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती कल्याण शाखेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे आणि कार्यवाह रवींद्र सावंत यांनी दिली. या वेळी महापौर विनीता राणे, आयुक्त गोविंद बोडके, नाट्य परिषद व नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे आदी उपस्थित राहतील. हा कार्यक्रम विनामूल्य आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.आकर्षक रंगसंगती, कल्पक विद्युत व्यवस्थाकल्याण : अत्रे रंगमंदिर १ आॅक्टोबरपासून खुले होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौर विनीता राणे, सभागृहनेते श्रेयस समेळ, नगरसेवक विश्वनाथ राणे आदींनी नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली.आकर्षक रंगसंगती आणि कल्पक विद्युत व्यवस्थेमुळे रंगमंदिराला नवी झळाळी मिळाली आहे. प्रेक्षागृह, रंगमंच या दोन्हीसाठी स्वतंत्र वातानुकूलन यंत्रणा बसवली आहे. व्हीआयपी रूम, ग्रीन रूम, स्वच्छतागृहांचीही दुरुस्ती करण्यात आली आहे.ज्येष्ठांचा सत्कार१ आॅक्टोबरला महापालिकेचा वर्धापनदिन असल्याने यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. नूतनीकरणानंतर रंगमंदिराचे उद्घाटन, महापालिका कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त होणाºया कार्यक्रमात विवाहाला५० वर्षे झालेल्या १० ज्येष्ठ दाम्पत्यांचा सत्कार होणार आहे.गणेशदर्शन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आदी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती उपव्यवस्थापक माणिक शिंदे यांनी दिली.
अत्रे रंगमंदिरात उद्या ‘चाचणी’चा प्रयोग, १ आॅक्टोबरपासून रसिकांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 4:07 AM