लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापतिपदासाठी बुधवारी निवडणूक होणार असून, स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपकडून दीपक उर्फ टोनी सिरवानी, तर शिवसेनेकडून कलवंतसिंग सोहतो यांनी अर्ज दाखल केले. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने सिरवानी यांची निवड निश्चित असल्याचे बोलले जात असून, या पक्षाचे समिती सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.
उल्हासनगर महापालिका स्थायी व प्रभाग समिती आपल्याकडे राखण्यासाठी शिवसेना-ओमी कलानी टीम व भाजप-रिपाइं आघाडी आमनेसामने उभी ठाकली आहे. १६ जून रोजी ही निवडणूक होणार आहे. स्थायी समितीमध्ये भाजप-रिपाइंचे बहुमत असले तरी, गेल्या वर्षीप्रमाणे शिवसेना काय राजकीय खेळी खेळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातूनच स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून भाजपने पक्षाचे सदस्य अज्ञातस्थळी नेले. स्थायी समितीमध्ये भाजपचे-८, रिपाइं-१, शिवसेना-५, राष्ट्रवादी-१ व साई पक्षाचा-१ असे एकूण १६ सदस्य असून, १६ पैकी भाजप-रिपाइंचे ९ सदस्य आहेत.
महापालिका प्रभाग समिती क्रं-१ च्या सभापतिपदासाठी भाजपकडून मीना कौर लबाना, तर शिवसेनेकडून अंजना म्हस्के व हरेश जग्याशी यांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग समिती क्रं-२ च्या सभापतिपदासाठी भाजपकडून महेश सुखरामनी, तर भाजप-ओमी टीमकडून छाया चक्रवर्ती, प्रभाग समिती क्रं-३ च्या सभापती पदासाठी भाजपकडून रवी जग्याशी, तर शिवसेना-ओमी टीमकडून दीप्ती दुधानी तर प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापतिपदी भाजपकडून सुमन सचदेव व शिवसेनेकडून विकास पाटील यांनी अर्ज दाखल केले. भाजपतील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवक शिवसेनेसोबत असून, राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका सुमन सचदेव यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला. साई पक्षाचे बहुतांश नगरसेवकांनी गेल्या महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातील बहुतांश नगरसेवकांनी एकत्र येऊन प्रभाग समिती क्रं-३ च्या सभापतिपदासाठी उमेदवार उभा केला.
चौकट
शिवसेना-ओमी टीमच्या आघाडीचे संकेत
महापौरपदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेसोबत भाजपतील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवक गेले होते. स्थायी व प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत त्यांची युती कायम असून, स्थायी सभापतिपद निवडणुकीत काही करिष्मा दाखवितात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.