ठाणे : टोरंट कंपनीला कळवा, मुंब्रा, दिवा, शीळ भागांत प्रवेश देण्यापूर्वी जनसुनावणी घेण्यात यावी, ही आ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मान्य केली आहे. त्यामुळे आता टोरंट कंपनीला स्थगिती मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात येत्या १७ जुलै रोजी ऊर्जामंत्री यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे मंगळवारी होणारे बंद आंदोलन स्थगित केले आहे.कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर परिसरांत वीजवितरणचे खासगीकरण करून टोरंट कंपनी लादली जात आहे. त्याविरोधात राष्ट्रवादीने यापूर्वीही आंदोलन केले होते. कळव्यासह या पट्ट्यातील ग्राहकांनी टोरंटला तीव्र विरोध दाखवल्यानंतरही या विभागाचे खासगीकरण झाले असून टोरंट पॉवर कंपनीला या परिसरात वीजवितरणाचे हक्क पुढील २० वर्षांसाठी देण्यात आले आहेत. या परिसरातील वीजवितरणाचे खाजगीकरण केले जाणार असल्याचे जाहीर केल्यापासून त्याला विरोध केला जात होता. मात्र, हा विरोध डावलून महावितरणने शीळ, मुंब्रा आणि कळवा या परिसरांच्या वीजवितरणाचे काम टोरंट पॉवर कंपनीला पुढील २० वर्षांसाठी दिले आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. २४ जूनपर्यंत जर टोरंटचा ठेका रद्द केला नाही, तर २५ जून रोजी कळवा-मुंब्रा, दिवा, शीळ-डायघर बंद करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला होता.यासंदर्भात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कळवा-मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान आणि नगरसेवक शानू पठाण यांच्यासमवेत भेट घेऊन जनसुनावणीची मागणी केली होती. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी ती मान्य केली असून १७ जुलै रोजी एका बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे टोरंट कंपनीला स्थगिती मिळते की आधीचाच निर्णय कायम राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.इशा-यानंतर निर्णयदरम्यान, सरकार जबरदस्ती करणार असेल आणि यातून जर हिंसा झाली, तर त्यास सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल. म्हणून, सरकारने प्रेमाने संवाद साधावा.सर्व नागरिकांना विश्वासात घ्यावे. त्यांचे म्हणणे ऐकून निर्णय घ्यावा. एकतर्फी निर्णय लादला गेल्यास प्रचंड विरोध करण्यात येईल, असा इशारा आ. आव्हाड यांनी दिला होता.
टोरंट कंपनीला मिळणार स्थगिती? ऊर्जामंत्र्यांकडे आज बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 1:25 AM