भिवंडी : थकीत वीजबिल, तसेच अवैध वीज कनेक्शनविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेले टोरंट पॉवरचे सुरक्षारक्षक तुकाराम पवार (वय ५५) यांचा जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू होण्याची घटना शनिवारी काटई खाडीपार येथे घडली. (Torrent Power employee beaten to death by mob) घरत कंपाऊंड येथे वीजचोरी तसेच थकीत वीजबिल मीटरसंदर्भात कारवाई करण्यासाठी टोरंट पॉवरचे कर्मचारी गेले असता, स्थानिक नागरिकांनी त्यांना विरोध केला. पवार यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की आणि मारहाण केली. त्यात पवार गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.टोरंट पॉवर प्रत्येक कारवाईदरम्यान पोलीस फाटा घेऊन जात असते. मात्र, आज पोलीस बंदोबस्त का घेतला नाही, असा सवाल करीत कंपनीही दोषी असल्याचा आरोप पवार कुटुंबीयांनी केला. याप्रकरणी टोरंटतर्फे निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती टोरंट पॉवरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदयानी यांनी दिली.
टोरंट पॉवरच्या कर्मचाऱ्याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 2:38 PM