ठाणे : विविध विषयांसाठी यापूर्वी आयुक्तांकडे पत्रव्यवहार करणाऱ्या महापौरांनी आता आयुक्तांच्या किंबहुना प्रशासनाच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. येत्या महासभेत ८४ विषयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवले आहेत. परंतु, महापालिकेचा अर्थसंकल्प अद्याप मंजूर झाला नसताना अशा पद्धतीने प्रस्ताव पटलावर आणणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करून महापौर संजय मोरे यांनी सर्वांशी चर्चा करूनच ते पटलावर आणण्याची सूचना केली आहेत. परंतु, यानिमित्ताने आयुक्त आणि लोकप्रतिनिधी असे शीतयुद्ध रंगण्याची चिन्हे मात्र निर्माण झाली आहेत.येत्या २० एप्रिलला होणाऱ्या महासभेत प्रशासनाने ८४ प्रस्ताव पटलावर ठेवले आहेत. यामध्ये रस्त्यांचे रुंदीकरण, दुरुस्ती, बांधणी, शिक्षण विभागाशी संबंधित विविध योजना, कळवा रुग्णालयात पीपीपीच्या माध्यमातून संगणक प्रणाली सुरू करणे, सीसीटीव्ही सर्व्हिलियन्स यंत्रणेची उभारणी करणे, सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे डिजिटल माध्यमिक शाळा सुरू करणे, शिक्षकांची फेस रीडिंगद्वारे उपस्थिती, विविध ठिकाणी जलवाहिन्या टाकणे, दुरुस्ती करणे, आदींसह इतर असे तब्बल ८४ प्रस्ताव महासभेत पटलावर मंजुरीसाठी ठेवले आहेत.दरम्यान, यातील बहुतेक शिक्षण विभागाशी संबंधित असलेले विषय, रस्ता रुंदीकरण, मजबुतीकरण आदींसह इतर काही महत्त्वाच्या प्रस्तावांबाबतच महापौरांनी आक्षेप नोंदवला आहे. वास्तविक, पाहता महासभेने जरी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली असली तरीदेखील अद्याप आयुक्तांनी किंबहुना प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे आधीच ते पटलावर आणणे चुकीचे असल्याचे मत महापौरांनी नोंदवले आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील जेवढे प्रस्ताव महापौरांकडे सादर केले होते, ते सर्वच प्रस्ताव त्यांनी पुन्हा प्रशासनाकडे परत धाडल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)आक्रमकतेची तलवार म्यान होणार?याबाबत त्यांनी आयुक्त आणि सचिव विभागाला एक पत्र लिहिले असून अशा चुकीच्या पद्धतीने चालणाऱ्या कारभाराबाबत आक्षेप नोंदवला आहे. तसेच हे प्रस्ताव मागे घेण्याची मागणीही केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासंदर्भात महापौरांवरदेखील आता दबाव आल्याचे समजत असून त्या दबावापुढे त्यांनी आपली तलवार म्यान करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. यासंदर्भात महापौर संजय मोरे यांना छेडले असता त्यांनी प्रशासनाला पाठवलेल्या पत्राची कबुली दिली असून अशा चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव आणण्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौरांनीच प्रशासनाविरोधात रणशिंग फुंकल्याने येत्या काळात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असा वाद पालिकेत रंगणार असल्याची चिन्हे आहेत.
तब्बल ८४ प्रस्ताव महापौरांनी रोखले
By admin | Published: April 14, 2016 12:18 AM