सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका सदस्यांची मुदत ४ एप्रिल रोजी संपणार असून मंगळवारी प्रारूप प्रभाग रचना आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या आदेशाने प्रसिद्ध करण्यात आला. एकूण ३० प्रभागातून ८९ नगरसेवक निवडून येणार असून २९ प्रभाग ३ सदस्यीय तर प्रभाग क्रं-१६ द्विसदस्यी असणार आहे. प्रभाग रचने बाबत शिवसेनेने समाधात तर रिपाइंने दलित प्रभाग फोडल्याचा आरोप केला. इच्छुक निवडणूक तयारीला लागल्याचे चित्र शहरात आहे.
उल्हासनगर महापालिकेत सन -२०१७ साली एकूण २० प्रभागात बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूका घेण्यात येऊन ७८ नगरसेवक निवडून आले होते. नव्या पद्धतीने व वाढीव लोकसंख्याच्या आधारे ११ सदस्य संख्या वाढणार आहे. ८९ सदस्यांकरीता ३० प्रभागाची रचना करण्यात आली आहे. तीन सदस्यीय प्रभागांची एकूण संख्या २९ आहे. तर प्रभाग क्रं-१६ मधून दोन सदस्यांचा आहे. महापालिका हद्दीत ५ लाख ६ हजार ९८ लोकसंख्या असून त्यापैकी अनुसूचित जातीची ८६ हजार ६८० तर अनुसूचित जमातीची ६ हजार ५७६ लोखसंख्या आहे. या लोखसंख्येच्या आधारे प्रभाग रचना करण्यात आली आहे. एका पॅनलमध्ये सरासरी १८ हजार लोकसंख्या आहे.
प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेवर हरकती सूचना लेखी स्वरुपात १४ फेब्रुवारी र्पयत नोंदविता येणार आहे. त्याची सुनावणी २६ फेब्रवारी रोजी घेतली जाणार आहे. प्रारूप प्रभाग रचना मध्ये शिवसेने मध्ये उत्सवाचे वातावरण असून शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख अरुण अशान यांनी समाधान व्यक्त केले. तर भाजपच्या पदाधिकार्यांनी नवीन प्रभाग रचने बाबत नाराजी व्यक्त केली. मनसेसह इतर पक्षाच्या पदाधिकार्यांनी वॉर्ड रचनेची माहिती घेऊन प्रतिक्रिया देणार असल्याचे म्हटले.
दलितवस्ती फोडल्याचा रिपाईचा आरोप
महापालिका प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली असून प्रभाग रचना करताना दलित वस्ती फोडण्यात आल्याचा आरोप रिपाईचे शहाराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी केली. याबाबत हरकती व सुचना करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभाग जैसे थे राहिल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याची प्रतिक्रिया भालेराव यांनी दिली.