डोंबिवली : वाशी क्राइम ब्रँचमध्ये कामाला असून वाशी येथील पोलीस ठाण्यात तुमच्याविरोधात एका मुलीने तक्रार दाखल केली आहे, अशी बतावणी करत शंकर परब या व्यक्तीकडून पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्या तुषार श्रीमंत शीलवंत या तोतया पोलीस अधिकाऱ्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
मुलीने दाखल केलेल्या तक्रार प्रकरणी कारवाई नको असेल तर पाच लाख द्यावे लागतील, अशी मागणी परब यांच्याकडे एप्रिलमध्ये तुषारने केली होती. त्यानुसार परब यांनी तुषारला तीन टप्प्यांत पाच लाख रुपये दिले. त्यानंतर पुन्हा कॉल करून परब यांच्याकडून आणखी १० लाखांची मागणी केली. जर पैसे नाही दिले तर कारवाई करतो, अशी धमकीही दिली. वारंवार पैशांची मागणी करून धमकावले जात असल्याप्रकरणी अखेर परब यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तुषारला पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यासाठी मानपाडा पोलिसांनी कल्याणच्या शिवाजी चौकात सापळा लावला. तुषारला तीन लाख रुपये घेण्यासाठी गुरुवारी सकाळी परब यांनी बोलावून घेतले. तुषार पैसे घेण्यासाठी त्याच्या गाडीने आला असता पोलीस उपनिरीक्षक अनंत लांब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तुषारला पैसे घेताना अटक केली. ज्या मुलीच्या तक्रारीचा धाक दाखवून खंडणी उकळली गेली ती एका मसाज पार्लरमध्ये कामाला होती. त्यावरूनच खंडणी उकळून धमकावण्याचा प्रकार घडल्याची माहिती उपनिरीक्षक लांब यांनी दिली.