ठाणे : ठाण्यात थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सत्ताधारी शिवसेनेनेसह विरोधकांनी उघड केले. त्यानंतर प्रशासनानेदेखील याची चौकशी करून त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर थिम पार्कची बिले वसूल करण्याबरोबरच बॉलीवूड पार्कचे काम थांबविण्याचे आदेशही महासभेत दिले आहेत. तसेच चित्रपटसृष्टीतील त्या प्रख्यात कलादिर्ग्दशकावरदेखील कारवाई व्हावी असेही सांगितले आहे. परंतु, आता याच कलादिर्ग्दशकाने उपवन येथील संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर हजेरी लावून शिवसेनेचे युवानेते तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंशी गुफ्तगू केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यामुळे या घोटाळ्याचे काय झाले, असा सवाल करण्यात येत आहे.ठाण्यातील घोडबंदर भागात थीम पार्कमध्ये उभारलेले पुतळे आणि इतर कलाविष्कारांवर १६ कोटींचा खर्च केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनीच सुरुवातीला याला आक्षेप घेतला होता. तसेच बॉलीवूड पार्कसाठी २० कोटींचा खर्च करण्यात येणार होता. परंतु, अर्धवट काम असताना पालिकेने संबंधित ठेकेदाराला ८ कोटींचे बिलही अदा केले होते. यावरूनदेखील वादंग होऊन प्रसिद्ध कलादिग्दर्शकावरही आक्षेप घेतला होता. संबंधित ठेकेदाराकडून हा खर्च वसूल करावा अशी मागणीही यावेळी झाली होती. परंतु, शिवसेनेची सत्ता असतानाही पालिका स्तरावर लावलेल्या समितीच्या चौकशीचे काय झाले याचे उत्तर अद्यापही मिळू शकलेले नाही.शिवसेनेचे पदाधिकारी ठेकेदाराच्या दिमतीलासोमवारी रात्री संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून हाच तथाकथीत ठेकेदार उपस्थित होता. शिवाय ज्या नगरसेवक आमदारांनी संबधींत ठेकेदाराच्या कामावर आक्षेप घेतला होता, तेदेखील याच व्यासपीठावर त्याच्या दिमतीला उपस्थित असल्याचे दिसले. त्यामुळे आता या ठेकेदाराला पाठिशी घालण्याचा शिवसेनेकडून प्रयत्न तर केला जात नाही ना? असा सवाल या निमित्ताने करण्यात येत आहे.मनसेचे आदित्य ठाकरेंना आव्हानआदित्य ठाकरे तुम्ही खरे कलाप्रेमी आहात म्हणून ठाण्यात आलात. मात्र, खरी आर्ट तुम्हाला पाहायची असेल तर तुमच्याच नगरसेवक, आमदारांच्या कृपेने झालेले ३६ कोटी रुपये खर्च करून बांधलेले थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कला एकदा भेट द्याच, असे आव्हान मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केले आहे. या भेटीतून ठाण्यात नक्की काय ‘करून दाखवले’ आहे याचा अंदाज तुम्हाला येईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.पालिकेसह राज्यातही शिवसेना सत्तेत असताना दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याशी जवळीक साधण्याच्या प्रकारावर पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
भ्रष्ट ठेकेदाराशी आदित्य ठाकरेंचे गुफ्तगू; शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 1:01 AM