ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृह परिसरात प्रेरणादायी ऐतिहासिक स्मारक आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. येथील कारागृह हे तळोजा अथवा घोडबंदर रोड भागातील हरित पट्ट्यात हलविण्यात यावे, अशा आशयाचा प्रस्ताव बुधवारच्या महासभेत मांडला जाण्याची शक्यता आहे. हे दोन्ही पर्याय सरकारपुढेही मांडले जातील.ठाण्याच्या मध्यवर्ती भागात ब्रिटीशकालीन कारागृह आहे. तेथे पर्यटनस्थळ सुरू करून कैद्यांसाठी शहरात घोडबंदर भागातील हरित पट्ट्यात अद्ययावत जेल बांधून देण्याची पालिकेची तयारी आहे. अथवा तळोजा येथील जेलचा विस्तार करून ठाणे जेल बंद करता येईल, असे दोन पर्याय पुढे आणण्यात आले आहेत.सत्ताधारी शिवसेनेने त्यासाठी पुढाकार घेतला असून त्या आशयाची प्रस्तावाची सूचना बुधवारच्या महासभेत सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्याकडून मांडली जाणार आहे.ऐतिहासिक वास्तुला कोणताही हात न लावता या भागाचा कायापालट करताना वृक्षलागवड, अन्य सोयी दिल्या जातील. देशभक्त ठाणेकर नागरिकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी तनमनधनाने त्याग केला, त्यांचे आणि देशासाठी बलिदान देणाºया शहिदांचे या ठिकाणी स्मारक व्हायला हवे. केवळ क्र ांतिदिन किंवा हुतात्मा दिनीच नव्हे तर वर्षभर हे स्मारक सर्वसामान्यांसाठी खुले असायला हवे. कारागृह परिसरातील ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणी जागविणारी स्मारके आणि ऐतिहासिक संदर्भ मांडणारे वस्तुसंग्रहालय याठिकाणी उभारता येईल. तसे झाल्यास शहराच्या शिरपेचात नक्कीच मानाचा तुरा रोवला जाईल आणि या ऐतिहासीक वास्तूचा सन्मानही राखला जाईल, असे मत ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केले.वारसा जतन करण्यासाठी -ठाणे कारागृहाला ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वातंत्र्यवीरांच्या वास्तव्याने ते पावन झालेले कारागृह म्हणून ते ओळखले जाते. हा वारसा आणि कारागृहाचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी, तसेच पुढच्या पिढीपर्यंत तो पोचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या जागी होणार पर्यटनस्थळ, महासभेत प्रस्ताव : कैद्यांना घोडबंदर किंवा तळोजात हलविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:44 AM