विशाल हळदे - ठाणे - पाणीटंचाई, अशी ओळख असूनही मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुका म्हणून शहापूर तालुक्याची ख्याती आहे. पावसाळ्यात तालुक्यातील अनेक ठिकाणे निसर्गसौंदर्यांनी नटली असून कसाऱ्याजवळील विहीगावजवळ असणारा अशोका धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. काही वर्षांपूर्वी या धबधब्यावर सिनेअभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्यावर अशोका चित्रपटासाठी एक गाणे चित्रित झाले होते. तिथपासूनच हा धबधबा ‘अशोका धबधबा’ नावाने ओळखला जाऊ लागला.
मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटाच्या आधी असलेल्या जव्हार फाट्यावरून विहिगावच्या या धबधब्यावर जाता येते. मध्य-रेल्वेच्या कसारा स्थानकावर उतरून जीप, रिक्षा किंवा एस.टी.ने या धबधब्यावर जाता येते. या ठिकाणची देखरेख वनविभागाकडून केली जात असून वनव्यवस्थापन कमिटीमार्फत पर्यटकांची काळजी घेतली जाते व मार्गदर्शनही केले जाते.
या धबधब्यामुळे परिसरातील आदिवासींना चार महिने रोजगार मिळतो. येथील गावकऱ्यांकडून घरगुती जेवणाची व्यवस्थाही केली जाते. जेवणाची ऑर्डर दिल्यास चुलीवरचे शाकाहारी व मांसाहारी जेवणही उपलब्ध केले जाते. परंतु आता जिल्हाधीकारी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत, त्यामूळ येथील गावकरी आता चिंतेत पडले आहेत. कारण मनाई आदेशामुळं येथील पर्यटन ठप्प झाले आहे.