शहापूर : शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात नसल्याने मुलांचे शिक्षण, मुलींची लगं्न आणि उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी संकटात सापडले आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील आमदार पांडुरंग बरोरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत तूरडाळ भेट पाठवून संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. या वेळी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे, ज्येष्ठ शेतकरी नेते पां.जा. विशे, एकनाथ वेखंडे आदी मान्यवर मंडळी होती. तहसीलदार रवींद्र बावीस्कर यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ आणि शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने संकटात सापडले असून शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च मिळणेदेखील दुरापास्त झाल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी गरजेची आहे. आधीच पिचलेले शेतकरी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे आणखी अडचणीत येणार आहे. या महामार्गात शेतकऱ्यांची हजारो हेक्टर बागायती जमीन संपादित होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. कर्जमाफी, समृद्धी महामार्ग रद्द आणि शेतीमालाला योग्यभाव याबाबत योग्य भूमिका घेण्याची विनंती आमदार बरोरा यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. (वार्ताहर)
मुख्यमंत्र्यांना तूरडाळ भेट
By admin | Published: May 02, 2017 2:20 AM