लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : कॅम्प नंबर ४ नेताजी चौकात मंगळवारी दुपारी टोइंग गाडीने रिक्षाला जोरदार धडक देऊन फरफटत नेल्याने चालक राकेश तिवारी गंभीर जखमी झाला, तर गौतम दादलानी या तरुणाला मार लागला असून, दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी टोइंग गाडी बंद करण्याची मागणी केली आहे.
नेताजी चौकात रस्त्यालगत लावलेली मोटारसायकल उचलण्याच्या वेळी टोइंग गाडीने एका रिक्षाला धडक देत भाटिया चौकाकडे फरफटत नेले. यामुळे चालक राजेश तिवारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर तिघे जखमी झाले. या घटनेनंतर रस्त्यावर उतरून टोइंग गाडी बंद करण्याची मागणी केली असून, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरेश कृष्णानी यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
घाबरलेल्या चालकाने काढला पळनेताजी चौकात टोइंग गाडीविरोधात व्यापारी रस्त्यावर उतरल्याने, टोइंग गाडीवरील चालक भीतीने पळून गेला. हिललाइन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन व्यापाऱ्यांची समजूत काढून रिक्षाचालक राकेश तिवारी याला रुग्णालयात हलविले. टोइंग गाडी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून, पोलिस तपास करीत आहेत.
टोइंग गाडी बंद केल्यास वाहतूककोंडीऐन सणासुदीच्या काळात टोइंग गाडी बंद केल्यास, वाहतूककोंडीची भीती व्यक्त होत आहे. व्यापारी व नागरिक बेशिस्तपणे रस्त्यांवर वाहने पार्किंग करीत असल्यानेच टोइंग गाडी व व्यापारी यांच्यात वाद निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे