उल्हासनगर : टोईंग गाडीकडे धावणाऱ्या एका तरुणांचा दुकाना समोरील लोखंडी जाळीत पाय अडकल्याने, रिक्षावर पडून गंभीर जखमी झाला. याप्रकारने व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेताच, वाहतूक पोलीस विभागाने टोईंग गाडी बंद केल्याने, वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उल्हासनगरात कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याची ओरड सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाकडून केली जाते. यादरम्यान शनिवारी कॅम्प नं-३ परिसरात नो पार्किंग मध्ये उभी असलेली मोटरसायकल उचलली असता, गाडी घेण्यासाठी धावलेल्या विनय भोईर याचा पाय दुकाना समोर ठेवलेल्या लोखंडी जाळीत अडकून, चालत्या रिक्षावर पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर जखमी झाली. याप्रकारने व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन, टोईंग गाडीची दादागिरी वाढली असून गाडी बंद करण्याची मागणी लावून धरून वाहतूक कार्यालयात धिंगाणा घातला. दरम्यान आमदार कुमार आयलानी यांनी क्रिटिकेअर रुग्णालयात जाऊन जखमी विनय भोईर यांच्या तब्येतीची विचारपुस केली.
शहरातील बहुतांश रस्ते अरुंद असून पार्किंग व्यवस्था अस्तित्वात नसल्याने, दुचाकी वाहने व्यापारी व नागरिक रस्त्याच्या एका बाजूला उभी करतात. वाहतूक पोलीस विभागाने रस्त्याचे पी-१ व पी-२ असे भाग करून एक दिवसाआड रस्त्याच्या बाजूलाच पार्किंग व्यवस्था केली. त्यामुळे रस्ता अधिकच अरुंद झाला. तसेच व्यापारी सर्रासपणे फुटपाथवर दुकानाचे साहित्य ठेवून, दुकानात येता-जाता यावे म्हणून थेट दुकाना समोरील फूटपाथच्या पुढे रस्त्यावर लोखंडी जाळी ठेवतात. विनय भोईर यांच्या पायात हीच लोखंडी जाळी अडकून तो गंभीर जखमी झाला. महापालिकेने फुटपाथवर ठेवलेल्या साहित्यावर व लोखंडी जाळीवर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे व महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्याने चालावे लागत असून अपघात झाल्यास जबाबदर कोन? असा प्रश्न विचारला जात आहे.
शहरात कोंडी होणार? शनिवारच्या अपघातानंतर व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्या आदेशानंतर टोईंग गाडी रविवार पासून बंद ठेवली. अशी माहिती वाहतूक विभागाचें वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय गायकवाड यांनी दिली. टोईंग गाडी बंद झाल्याने, व्यापारी व नागरिकांनी दुचाकी कुठेही पार्किंग केल्यास, शहरात वाहतूक कोंडीची शक्यता व्यक्त होत आहे.