भिवंडी : भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी शिवसैनिकांवर खोट्या केसेस दाखल करून त्यांना तुरु ंगात डांबण्याचे काम केले, असा आरोप करतानाच काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे हे मौनीबाबा आहेत, तर कपिल पाटील यांनी लोकसभेत जाऊन केवळ चैन केल्यामुळे ते चैनीबाबा आहेत, अशी टीका जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती व भिवंडीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
म्हात्रे यांनी गेले काही दिवस काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याकरिता प्रयत्न केले होते. त्यात अपयश आल्याने मंगळवारी त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. म्हात्रे म्हणाले की, भिवंडीत विकासाची कामे करण्याऐवजी पाटील यांनी केवळ घोषणाबाजी करून मतदारांची फसवणूक केली. २००९ मध्ये भिवंडीतून लोकसभेत निवडून गेलेले सुरेश टावरे हे मौनीबाबा होते. कपिल पाटील यांनी लोकसभेत जाऊन मौजमजा केली. त्यामुळे ते चैनीबाबा आहेत. भिवंडी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी जागेवर अनधिकृत गोदामे उभी आहेत. ही गोदामे अधिकृत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खा. कपिल पाटील यांनी दिले होते. मात्र, त्यांनी गोदाम व्यावसायिकांची फसवणूक केली. यंत्रमाग उद्योग बंद पडत आहे. त्यास चालना देण्यासाठी शासनाने पॅकेज देणे गरजेचे होते.
मात्र, ते दिले नाही. टोरंट पॉवर कंपनीवर कारवाई करण्याऐवजी तिला पाठीशी घालण्याचे काम पाटील यांनी केले. ‘मातोश्री’वरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चेला बोलावल्यास आपण आपली व्यथा मांडू, असे मत म्हात्रे यांनी व्यक्त केले व निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले.