मीरारोड - भाईंदर पुर्व भागातील मुख्य रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई साठी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने तक्रारी करुन महापालिका कारवाई करत नसल्याने भाईंदरच्या व्यापारी संघटना, रहिवाशांनी आज बुधवारपासून नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.भाईंदर पुर्वेला नवघर मार्ग, तलाव मार्ग, बाळाराम पाटील मार्ग व रेल्वे स्थानक समांतर मार्ग, नवघर - फाटक मार्ग, महात्मा फुले मार्ग आदी मुख्य रस्ते व पदपथ फेरीवाल्यांच्या अतिक्रमणा मुळे व्यापुन गेले आहेत. आधीच हे रस्ते अतिशय अरुंद असुन त्यावर प्रचंड रहदारी व वाहनांची वर्दळ असते. त्यात फेरीवाल्यांचा अडसर ठरतोच शिवाय गेल्या तीन वर्षात तर नव्याने आलेल्या फेरीवाल्यांची संख्या देखील कित्येक पटीने वाढलेली आहे.फेरीवाले, बाजार वसुली ठेकेदार, पालिका प्रशासन व काही लोकप्रतिनिधींचे चे संगनमत असल्याने या फेरीवाल्यांवर ठोस व नियमीत कारवाई केली जात नाही. उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानका पासुन १५० मीटर तर शाळा - महाविद्यालय, रुग्णालय व धार्मिक स्थळां पासुन १०० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असताना देखील न्यायालयाच्या आदेशावर टिच्चुन फेरीवाले सर्रास तेथे बसत आहेत. ना फेरीवाला झोन चे पालिकेने फलक लावले असुनही त्या भागात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. फेरीवाले वाढतील तेवढा जास्त फायदा बाजार वसुली ठेकेदारासह यात हितसंबंध गुंतलेल्यांचा असतो असे सुत्र सांगतात.महापालिकेला कारवाईसाठी सातत्याने निवेदने देऊन देखील प्रभाग अधिकारी व फेरीवाला निर्मुलन पथका पासुन थेट आयुक्त व लोकप्रतिनिधीं कडुन कठोर कारवाईच होत नसल्याने नागरीकांना चालण्यासाठी रस्ते - पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. वाहनांची मोठी संख्या व वर्दळ असल्याने नागरीकांना जीव मुठीत धरुन रस्त्यावरुन चालावे लागते. विद्यार्थी, महिला, वृध्दांना तर खुपच जाच सहन करावा लागतोय. ध्वनी व वायु प्रदुषणा मुळे लोकं त्रासली आहेत.संविधानाने दुकान चालकांना त्यांचा व्यवसाय करण्याचा घटनात्मक अधिकार दिला आहे. दुकान चालकाने लाखो रुपयांची आयुष्याची पुंजी लाऊन दुकान खरेदी केले असते. किंवा भाड्याने घेतले असते. पण दुकानां समोर पदपथ - रस्त्यावर अतिक्रमण करुन बसणारया फेरीवाल्यां मुळ स्वत:च्या जागेत सनदशिर मार्गाने आपला व्यवसाय करणारया दुकान चालकांना सुध्दा मोठा त्रास सहन करावा लागुन आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या भागातील दुकानदारच नव्हे तर रहिवाशांच्या गृहनिर्माण संस्था व रुग्णालयांनी सुध्दा फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करा अशी लेखी मागणी केली असल्याचे भार्इंदर रेडिमेड एण्ड क्लॉथ मर्चंट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र गुर्जर यांनी सांगीतले.लोकप्रतिनिधी व पालिकेची ठेकेदार धार्जिणी भुमिका, फेरीवाल्यांना दिले जाणारे संरक्षण पाहता सर्वसामान्य नागरीक व दुकानदार यांना अतोनात त्रास होत असल्याने तीन वेळा आंदोलन करण्याची पत्रे पालिका व पोलीसांना दिली होती. परंतु प्रत्येक वेळी कारवाईचे खोटे आश्वासन दिले गेले. पण आता मात्र या जाचाचा कहर झालेला असुन त्यामुळेच बेमुदत धरणे आंदोलन रहिवाशी, व्यापारी व संस्थांनी सुरु केले आहे असे गुर्जर म्हणाले. घिसुलाल माली, रमेश चौधरी, बाबूभाई माली, सतिश राजपुरोहित, राकेश जैन, श्रवण वैष्णव, किशोर सुराणा, बळीराज गवळी, प्रिन्स जैसवाल, दर्शन पाटील आदी अनेक व्यापारी, रहिवाशी आंदोलनात सहभागी झालेले आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन रेल्वे स्थानक, शैक्षणिक संस्था, रुग्णालय, धार्मिक स्थळांच्या प्रतिबंधित क्षेत्रात बसणाराया, ना फेरीवाला क्षेत्रात बसणाराया तसेच मुख्य वर्दळीच्या रस्ते - पदपथांवर बसणाराया फेरीवाल्यां विरोधात गुन्हे दाखल करावेत, त्यांच्यावर रोज सातत्याने कठोर कारवाई करावी, या फेरीवाल्यांवर कारवाई न करणाराया पालिका अधिकारी - कर्मचारी यांना तातडीने निलंबित करुन भ्रष्टाचार प्रतिबंधत्मक कायदयाखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी असल्याचे गुर्जर यांनी सांगीतले.
भाईंदर पुर्व भागातील फेरीवाल्यांविरोधात व्यापारी संघटनांनी सुरु केले बेमुदत धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 8:12 PM