अंबरनाथ : अंबरनाथ नगपरिषदेच्या अधिक्षक निवास आणि अग्निशमन कर्मचारी निवास ही इमारत पाडल्यावर त्या इमारतीच्या जागेवर लहानसे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रयत्न अंबरनाथ पालिका करणार आहे. या संकुलामुळे पालिकेला भाड्याच्या स्वरुपात आर्थिक स्त्रोत निर्माण करणे शक्य होणार आहे. त्या अनुषंगाने पालिका प्रशासन निधीची तरतूद करण्यासाठी पाठपुरावा करीत आहे.अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयाची इमारत, अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची इमारत, कर्मचारी निवासस्थानाची इमारत हे सर्व जीर्ण झाल्याने पालिका प्रशासनाने धोकादायक ठरत असलेल्या इमारतींचे बांधकाम पाडण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र इमारत पाडल्यावर तो भूखंड तसाच मोकळा न ठेवता त्या ठिकाणी पालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत तयार करण्याचा विचार पालिका प्रशासन करित आहे. नव्याने ज्या इमारती तोडण्यात येत आहे. त्या इमारतीच्या बाजूलाच पालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे हा भूखंड मोकळा न ठेवता त्या ठिकाणी रस्त्याला समांतर व्यापरी संकुल उभारुन त्यातील गाळे भाडेतत्वावर व्यापा-यांना देण्याचा प्रस्तावावर पालिका प्रशासन तयारी करित आहे. इमारतीसाठी निधीची तरतूद महत्त्वाची बाब असल्याने त्याचे नियोजन देखील पालिका अधिकारी स्तरावर सुरु आहे. या आधी देखील भाजी मंडईच्या समोरील पालिकेची निवासी इमारत तोडुन त्या ठिकाणी त्याचा विकास करण्याचा पालिकेचा प्रयत्न होता. (प्रतिनिधी)
धोकादायक इमारतीच्या जागेवर व्यापारी संकूल
By admin | Published: January 03, 2017 5:32 AM