मुंब्रा : कोरोनाचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी सुरू केलेल्या मिनी लॉकडाऊनविरोधात बुधवारी मुंब्य्रातील अमृतनगर भागातील गुलाब पार्क बाजारपेठेतील व्यापारी रस्त्यावर उतरले होते. यामुळे येथील नागरी वसाहतीमधून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. यावेळी व्यापाऱ्यांनी राज्य शासनाने लागू केलेले लॉकडाऊन आणि ठामपा प्रत्यक्षात राबवीत असलेल्या लॉकडाऊनमध्ये तफावत असल्याचा दावा केला, तसेच लॉकडाऊन ‘वापस लो, दुकान खोलने की परमिशन दो’च्या घोषणा दिल्या.
सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी देता येत नसेल तर पी-१, पी-२ अंतर्गत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी काही व्यापाऱ्यांनी केली. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमधून सावरत असताना पुन्हा सुरू करण्यात आलेल्या या मिनी लॉकडाऊनमुळे बेकारी आणि बेरोजगारी वाढेल आणि नागरिक कोरोनामुळे नाही तर भुकेने मरतील, अशी भीती रस्त्यावर उतरलेल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.