ठाणे : ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रमाणे ठाण्यात यापूर्वी देखील अशाच प्रकारचे हल्ले अधिकाऱ्यांवर झाले आहेत. यापूर्वीदेखील आणखी एका महिला साहाय्यक आयुक्ताला फेरीवाला दादाने धमकी दिली होती. त्यामुळे या फेरीवाल्यांची किंवा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची दादागिरी वाढली असून, त्याचा फटका मात्र अधिकाऱ्यांना हल्ला किंवा धमकीच्या माध्यमातून सहन करावा लागत आहे.
यापूर्वी नौपाडा भागात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या साहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनादेखील फेरीवाला दादाने धमकी दिल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते, तर गावदेवी भागात कारवाईसाठी गेलेल्या अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यावरदेखील हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. शिवाय, मुंब्रा आणि दिव्यातही अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या साहाय्यक आयुक्तांना अशा प्रकारच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागले होते. त्यातही मुंब्य्रात एका जमावाने पाठलाग करून पालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, तर गांधीनगर भागात उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्यावर हल्ला झाल्याची घटना आजही ताजी आहे.
मागील काही वर्षांत अनधिकृत बांधकामे असोत, किंवा फेरीवाल्यांची समस्या असो, त्यावर कारवाईसाठी गेलेल्यांना अशाच प्रकारे हल्ले किंवा धमकींना सामोरे जावे लागले आहे. परंतु, आता त्यांना हा राजाश्रय कोणामुळे मिळतो, त्यांना पाठीशी कोण घालतो, रस्ते, फुटपाथ अडविल्यानंतर त्यांच्याकडून हप्ते आणि पावत्या कोण फाडतो, असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.