ठाणे दि.30 (जिमाका) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) यांचे कार्यक्षेत्राच्या हद्दीत दिनांक 30 डिसेंबर 2020 ते 05 जानेवारी 2021 पर्यंत रात्री 11.00 वा. ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार खालील बाबींवर निंर्बध लादण्यात आलेले आहेत
सर्व प्रकारच्या आस्थापना तसेच सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणे, विरंगुळयासाठी फिरणे, सायकल,मोटार सायकल, मोटार वाहनांतुन विनाकारण फेरफटका मारणे, अनावश्यक व विनाकारण होणारी वाहतुक,इमारतीच्या किंवा सोसायटीच्या आवारात, गच्चीवर किंवा फार्महाऊस, हॉटेल आस्थापना, पब, क्लब, रिसॉर्ट येथे साजरे होणारे खाजगी समारंभ, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रिडा स्पर्धा, इत्यादी.नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणूका काढण्यात येऊ नयेत.फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.नमुद कालावधीत धार्मिक उत्सव किंवा कार्यक्रम साजरा करावयाचा असल्यास कार्यक्रम आयोजकांनी संबंधित पोलीस ठाणेकडून त्याबाबत विशेष परवानगी आवश्यक राहील. ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर करणेसाठी सन 2020 मधील विनिर्दिष्ट 15 दिवसांसाठी फक्त ध्वनीची विहित मर्यादा राखुन सकाळी 6 .00 ते रात्री 12.00 वाजेपर्यत अनुमती देण्यात आली होती तथापि या 15 दिवसांपैकी दि 31 डिसेंबर 2020 रोजीसाठी सवलत रात्री 12.00 वा. ऐवजी फक्त 11.00 वाजेपर्यत सुधारीत करण्यात आली आहे.
शासनाने ज्या आस्थापना सुरू ठेवण्याबाबत परवानगी दिलेली आहे त्या सर्व आस्थापना, वैद्यकीय सेवा पुरविणा-या आस्थापना, अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी व आस्थापना, अत्यावश्यक किंवा तातडीची वैद्यकीय गरज तसेच अत्यावश्यक सेवा उदा. दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू यांची वाहतुक व पुरवठा इत्यादी सुरळीत चालू राहतील.
खालील मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाल निरोप देण्यासाठी व दि. 01 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहतील असेही ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.