मुरबाड : मुरबाड आगारात डिझेल नसल्यामुळे सर्व बस आगारातच उभ्या असल्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. यामुळे बेकायदा वाहतुकीला उधाण आले असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुरबाड आगारात एकूण ५० बस असून, सध्या कोरोनाचे सावट असल्याने नागरिक बाहेर पडत नाहीत. त्यामुळे आगाराचे भारमान कमी असल्याने मुरबाड आगार काही अंशी तोट्यात जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतेक फेऱ्या या कमी उत्पन्नामुळे बंद केल्या जातात, तर शहरी भागातील फेऱ्या या सुरळीतपणे सुरू असतात, परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुरबाड आगाराला विभागीय पातळीवरून डिझेलचा पुरवठा होत नसल्याने आगारातील सर्व बस उभ्या आहेत.
त्यामुळे ग्रामीण, तसेच शहरी भागातील चाकरमान्यांचे हाल होत असून, ते प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घेत आहे. खासगी वाहनधारक हे त्यांच्या फायद्यासाठी मर्यादित सीटपेक्षा अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक करत असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, नागरिक मुठीत जीव धरून प्रवास करीत आहेत.