ठाणे : मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेडअंतर्गत मुंब्रा रेतीबंदर येथे लोखंडी पूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी ७ मार्च रोजी दिवसभर या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून, या भागात कोणत्याहीप्रकारे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठाण्यासह, पालघर आणि महामार्ग पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
मुंब्रा रेतीबंदर याठिकाणी मुख्य रस्त्यावर उड्डाणपुलाद्वारे रेल्वे मार्ग टाकण्याचे आणि उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. ठाण्याकडून दिवा दिशेने नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता हा मार्ग जोडण्यासाठी मुंब्रा रेतीबंदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर तयार लोखंडी पूल बसविणे गरजेचे आहे. या लोखंडी पुलाची लांबी ८० मीटर, रुंदी सहा मीटर, उंची ११ मीटर आणि वजन ३५५ टन आहे. याच कामासाठी हा राष्ट्रीय महामार्ग रेतीबंदर रेल्वे पुलाच्या ठिकाणी ६ मार्च रोजी रात्री १२ ते ७ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास बंंद ठेवला जाणार आहे. यासाठी वाहतूककोंडी होऊ नये तसेच ती सुरळीत रहावी म्हणून अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे.
* हे मार्ग राहणार बंद-
माजीवडा, खारेगाव टोलनाका, शीळफाटा तसेच नाशिक ते ठाण्याच्या दिशेने येणारा पडघा आणि राजनोलीनाका हे मार्ग या काळात बंद ठेवले जाणार आहेत.
* असा राहणार पोलीस बंदोबस्त -
मुंब्रा बायपासच्या आधी ५० मीटरवर लोखंडी पूल उभारणीच्या कामासाठी कोणताही अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रणासाठी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १८ निरीक्षकांसह ५५० पोलीस आणि १५० वाहतूक वॅार्डन बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. त्याचबरोबर ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, पालघर, मीरा भाईंदर वसई-विरार आणि महामार्ग पोलिसांचा किमान २०० पोलिसांचा ताफाही त्या त्या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी तैनात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.