डोंबिवली : दिवाळीच्या तोंडावर शहरात अचानकपणे फेरीवाले वाढले असून त्यांनी जागा मिळेल तेथे पथारी पसरली आहे. पूर्वेतील फडके रोडवर शुक्रवारी सकाळपासूनच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठीही जागा नव्हती. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.
दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नागरिकांनी फडके पथवर गर्दी केली होती. पार्किंगमधील वाहनांच्या पुढे फेरीवाल्यांनी पथारी मांडल्याने फतेह अली क्रॉस रस्त्यावर फडके पथला जाताना वाहतूककोंडी झाली होती. दिवसभर ही कोंडी कायम असल्याने वाहनांच्या कर्कश हॉर्नमुळे परिसरातील रहिवाशांंमध्ये अस्वस्थता पसरली होती.
बेशिस्त वाहनचालकांनी रस्ता मिळेल तशा गाड्या पुढे काढल्याने दोन्ही दिशा जॅम झाल्या होत्या. काही केल्या वाहतूककोंडी कमी होत नव्हती. खासगी कंपन्यांच्या मोठ्या बसमुळेही या कोंडीत आणखी भर पडली. फडके रोड, बाजीप्रभू चौक, इंदिरा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चाररस्ता, पारसमणी चौक ही सर्व ठिकाणे कोंडीने फुल्ल झाली होती. दुचाकी, रिक्षा, कार, टेम्पो आदींमुळे सकाळच्या वेळेत वाहनांच्या धुरामुळेही वाट काढताना नागरिकांना त्रास झाला. काही ठिकाणी सोसायट्यांच्या प्रवेशद्वाराजवळच वाहने अडकल्याने रहिवाशांची पंचाईत झाली होती.
डोंबिवली पश्चिमेलाही रेल्वेस्थानकाबाहेरील महात्मा गांधी रस्त्यावर सकाळच्या सुमारास वाहतूककोंडी झाली होती. स्थानकाबाहेरचा परिसर बेशिस्त रिक्षाचालकांनी बळकावल्याने कोंडीत आणखी भर पडली. या रस्त्यावर कुठेही वाहतूक पोलीस नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घनश्याम गुप्ते रस्त्यावरही फेरीवाले वाढल्याचे पाहायला मिळाले.
वाट काढताना आले नाकीनऊ, कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिक हैराण
पूर्वेला इंदिरा गांधी चौक, चाररस्ता, रामनगर परिसर, जोशी हायस्कूल परिसर वगळता अन्य कुठेही वाहतूक पोलीस आढळले नाहीत. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांचे विशेषत: दुचाकीचालकांचे चांगलेच फावले होते.
वाहतूककोंडीत वाहने अडकल्याने सर्व चालक कर्णकर्कश हॉर्न वाजवत होते. त्याचबरोबर अडगळीच्या ठिकाणी वाहने उभी केली जात होती. रेल्वेस्थानक परिसरात बहुतांश ठिकाणी रस्त्यांच्या पदपथांवर दुचाक्या पार्क केल्या होत्या. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदींना मार्ग काढताना नाकीनऊ आले होते.