डोंबिवली : एकीकडे पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांनी शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असताना आता ठाकुर्ली उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे वाहतूककोंडी होत असून, पूर्व व पश्चिमेस दोन्ही दिशांना वाहनांच्या रांगा लागत आहेत. तसेच खड्डे चुकविण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
डोंबिवली पूर्व - पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाणपूल कमकुवत झाल्याने सप्टेंबर २०१९मध्ये वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्यात आला. तो पूल पाडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहे. जूनपासून पूल बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे केडीएमसीकडून सांगितले जात आहे. परंतु, आजतागायत या पुलाचे काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून ठाकुर्ली पुलावरून वाहनांना पूर्व-पश्चिम ये-जा करावी लागत आहे.
पावसाच्या सुरुवातीला जूनमध्ये ठाकुर्ली पश्चिमेकडील भागातील पुलाच्या ठिकाणी खड्डे पडले होते. परंतु आता पूर्व-पश्चिम भागासह पुलाच्या मध्यभागीदेखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे येथील वाहतूक मंदावली असून, परिणामी वाहनचालकांना कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हे कोंडीचे चित्र गेल्या काही दिवसांपासून सदैव पाहायला मिळत आहे.
वाहतूक पोलिसांचीही दमछाक
केडीएमसीकडून सध्या रस्त्यातील खड्डे खडीकरणाने भरण्याचे काम सुरू आहे. उड्डाणपुलावरचे खड्डे भरूनही त्यातील माती पावसामुळे वाहून गेली आहे. वाहतूक पोलिसांचीही कोंडी सोडविताना दमछाक होत असून, वाहनचालकही कोंडीने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नको तो पूर्व-पश्चिम प्रवास, अशी भावना काही वाहनचालकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
--------------------