अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा हा सध्या वाहतूक कोंडीचे नवीन डेस्टिनेशन झाल्याची जाणीव होऊ लागली आहे. नेवाळी फाट्यावर वाहतूक पोलिसांना योग्य नियोजन करता येत नसल्याने या चौकात दररोज वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. आज दुपारी एक वाजता अशाच वाहतूक कोंडीत अर्धा तास रुग्णवाहिका देखील अडकली होती.
काटईनाका ते बदलापूर या राज्य महामार्गातील नेवाळी फाटा हे सर्वात वरदळीचे ठिकाण ठरत आहे. नेवळी फाट्यावरून एक रस्ता हा मलंगडकडे तर दुसरा रस्ता कल्याण शहराकडे जात असल्यामुळे या राज्य महामार्गावर नियमित वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. चौकात पोलीस चौकी देखील असून त्या ठिकाणी 24 तास पोलीस कर्मचारी तैनात असतात. असे असले तरी वाहतुकीचे नियोजन करण्यात पोलीस प्रशासन आणि वाहतूक पोलिसांना देखील अपयश येत आहे. याच राज्य महामार्गाच्या एका भागात काँक्रिटी करण्याचे काम सुरू असल्यामुळे नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.
बुधवारी दुपारी एक वाजता याच ठिकाणी भली मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तब्बल दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दहा ते पंधरा मिनिटं एकाच ठिकाणी वाहन चालकांना गाडीतच थांबावे लागत होते, तर वाहतूक क्लियर करण्यासाठी देखील वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत होती. नेवाळी फाट्यावर वाहतूक कोंडी झाल्यावर स्थानिक ग्रामस्थांसह अनेक वाहन चालक हे रॉंग साईडने गाड्या टाकत असल्याने त्याचा देखील वाहतूक कोंडीला दुहेरी फटका बसत आहे.
आज दुपारी झालेल्या वाहतूक कोंडीत तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ एका रुग्णवाहिकेला उभी करून ठेवण्याची वेळ आली होती. अखेर काही नागरिकांनी पुढाकार घेतल्यानंतर या ॲम्बुलन्सला रॉंग साईडने जागा उपलब्ध करून देत ती पुढे मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. नेवाळी फाटा परिसरात होणारी वाहतूक कोंडी ही आता स्थानिक नागरिकांसाठी देखील डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.