ठाणे : वाहतूक कोंडी घोडबंदरवासियांची पाठ सोडत नसल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी बोरिवली येथे घोडबंदर रोड मार्गे निघालेल्या टोमॅटोच्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक पातलीपाडा उड्डाणपुलावर उलटल्याची घटना पहाटे चार ते सव्वाचार वाजण्याच्या घडली. या अपघातात ट्रकमधील सुमारे २ ते ३ टन टोमॅटो रस्त्यावर पसरून अक्षरश: चिखल झाला होता. तसेच ट्रकमधील तेलही रस्त्यावर सांडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर तो उड्डाणपूल वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. परंतु त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास पुन्हा मानपाडा उड्डाणुपलावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कंटेनर बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम अंतर्गत रस्त्यावर देखील झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दुपारच्या सत्रात शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना काहीसा लेट मार्क लागला.
महेंद्र गुप्ता यांच्या मालकीच्या ट्रकमधून सुमारे २ ते ३ टन टोमॅटो हे शिरपूर येथून घोडबंदर रोडवरून बोरिवलीला घेऊन निघाला होता. ठाण्यातून जाताना पातलीपाडा उड्डाणपुलावर चालकाचा त्या ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक उलटला. या घटनेत ट्रक मधील टोमॅटो रस्त्यावर पसरले तसेच तेल ही सांडले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, घनकचरा विभागाचे अधिकारी व कर्मचारी या विभागांनी धाव घेतली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून घटनास्थळावरून ट्रक चालक पळून गेला. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक हायड्रा मशिनच्या साहाय्याने रोडच्या बाजूला करण्यात आला आहे.
याशिवाय पातलीपाडा उड्डाणपुलावरती पडलेले टोमॅटो जेसीबी मशीनच्या सहाय्याने व घनकचरा विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने उचलून घनकचरा विभागाच्या घंटागाडीमध्ये भरण्यात आले आहेत. तर, टोमॅटो पडून चिखल झालेल्या रोडवरती अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाणी मारून तो रस्ता साफ करण्यात आला असून सांडलेल्या तेलावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांमार्फत माती पसरविण्यात आली. त्याच्यानंतर पातलीपाडा उड्डाणपूल सुमारे ०५ तासाच्या प्रयत्नानंतर वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
दुसरीकडे ही कोंडी फुटत नाही तोच घोडबंदरवरुन ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मानपाडा येथील उड्डाणपुलावर सकाळी ११ च्या सुमारास कंटेनर बंद पडल्याची घटना घडली. हा कंटेनर पुलावर चढतांनाच बंद पडल्याने त्याचा परिणाम वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. तर या कोंडीतून सुटण्यासाठी वाहन चालकांनी हिरानंदानी मार्गे आझाद नगर, ढोकाळी या मार्गाचा अवलंब केला. मात्र एकाच वेळी अनेक वाहने येथील अंतर्गत रस्त्यांवर आल्याने या मार्गावर देखील वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. दुपारी १२ च्या सुमारास वाहतूक पोलिसांनी कंटेनर हटविण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर धिम्या गतीने वाहतूक सुरु झाली. परंतु यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना काहीसा लेटमार्क लागल्याचेही दिसून आले.