ठाणे: मुंब्य्रातील बाह्यवळण मार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावर तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविल्याने ठाण्यातील कोपरी तसेच कल्याण परिसरात वाहतूककोंडीचे चित्र शुक्रवारी निर्माण झाले होते. मात्र, ही कोंडी फोडण्यासाठी नेमलेली विशेष पथके, तसेच तैनात असलेल्या क्रेन्समुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात पोलिसांना यश आले.
मुंब्रा बायपास मार्गावर पनवेल ते ठाणे आणि ठाणे ते पनवेल या मार्गावर खड्डे पडले आहेत. पनवेल ते ठाणे मार्गावर तर सहा ठिकाणी खड्डे असून, एका ठिकाणी पुलाची लोखंडी सळई निखळली आहे. त्यामुळेच नवी मुंबईतून ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक शाखेने घेतला आहे. मात्र, हलक्या वाहनांना या मार्गावरून परवानगी देण्यात आली आहे. या काळात मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू केले आहे. ही मुंब्रा येथील वाहतूक महापे ते रबाले, ऐरोली मार्गे पूर्वद्रुतगती मार्गावर वळविण्यात आली आहे. ठाणे शहरात दुपारी १२ ते ४ आणि रात्री १० ते पहाटे ५ यादरम्यान अवजड वाहनांना परवानगी दिलेली आहे. त्यामुळे याच काळात ठाण्यातील कोपरी भागात तसेच कल्याणमधील काही भागात शुक्रवारी १२ ते सायंकाळी ६ या कालावधीत मोठी वाहतूककोंडी झाली होती. परंतु, वाहतूक पोलिसांनी दोन जादा क्रेन्स तसेच वाहतूक पोलिसांची कुमक तैनात ठेवली होती. त्यामुळे ही कोंडी फोडण्यात यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.