पारोळ : ठाणो-घोडबंदर मार्गावर गायमुख येथील नागमोडी वळणावर बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास मालवाहू ट्रक पलटी झाल्याने वाहतूककोंडी झाली. यामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होऊन वर्सोवा ते वसईफाटय़ार्पयत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांची प्रचंड गैरसोय झाली. या कोंडीतून पाच तासांनी सुटका झाली. अनेकांनी तर आपली वाहने घराकडे वळवली.
वसई, विरार, नालासोपारा परिसरात मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी नोकरीधंद्यासाठी जाणारा वर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. कोरोना महामारीत प्रशासनाच्या प्रवासी वाहतूक सेवा कमी प्रमाणात असल्याने व लोकल ट्रेनमधून अजूनही सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाची परवानगी नसल्याने अनेक प्रवासी एसटी व खाजगी वाहनांतून ठाणो व मुंबईकडे जातात. यासाठी नालासोपारा, वसई, अर्नाळा या एसटी आगारांतून खास बस सोडण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईकडे जाणारे हजारो प्रवासी बसमधून प्रवास करत असल्याने रोजच या मार्गावर वाहतूककोंडी होते. पण, आज पहाटेपासून सकाळी ९ पर्यंत महामार्गावर वाहतूककोंडी झाल्याने अनेकांना कामावर दांडी मारावी लागली, तर अनेकांना लेटमार्क लागला.
कोरोनामुळे बंद केलेली लोकलसेवा अद्याप बंद आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्याने अनेकांची कार्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे त्यांना कंपन्यांकडून कामावर बोलावले जात आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे खुली झालेली नसल्यामुळे नोकरदारांचे कामावर पोहोचेपर्यंत खूप हाल होत आहेत. अनेकदा गर्दीतूनही प्रवास करावा लागत असून प्रवासभाड्याचा खर्चही वाढल्याने आर्थिक बजेटही कोसळले आहे. त्यामुळे लवकर लोकल सेवा सुरू करण्याची मागणी नोकरदारांकडून करण्यात येत आहे.