कल्याण : केंद्र सरकारने केलेल्या भरमसाट अन्यायकारक परिवहन शुल्कवाढीविरोधात ३१ जानेवारीला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक रिक्षा, टॅक्सी, ट्रक, स्कूल बस, व्हॅन या वाहतूकदारांनी दिली असताना महापालिका निवडणुकांची लागू असलेली आचारसंहिता पाहता यादिवशी स्थानिक आरटीओ कार्यालयावर निदर्शने करण्याचा निर्णय कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने शुक्रवारी घेतला. निवडणुका झाल्यानंतर एक दिवस चक्काजाम आंदोलन मुंबई महानगर क्षेत्रात केले जाईल, अशी घोषणा महासंघाचे अध्यक्ष व केडीएमसीचे नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी केली. पुण्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यव्यापी चक्काजामचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाची बैठक शुक्रवारी झाली. जिल्हापरिषदा, महापालिका तसेच कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका राज्यव्यापी आंदोलनालाही बसल्याचे यावेळी दिसले. ३१ जानेवारीला चक्काजाम आंदोलनात सहभागी न होता केवळ ठाणे आरटीओ कार्यालयावर निदर्शने करण्याची भूमिका महासंघाचे अध्यक्ष पेणकर यांना जाहीर करावी लागली आहे. यावेळी रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो, स्कूल बस, व्हॅन या वाहतूकदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.महासंघाच्या मेळाव्याला ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, शहापूर येथील वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पेणकर जो निर्णय घेतील, त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही या वेळी सर्व प्रतिनिधींकडून देण्यात आली. नवीन रिक्षांची नोंदणी, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ट्रान्सफर फी, पत्त्यात बदल, वाहन इंधनबदल, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, विलंब दंड आदींच्या शुल्कात केंद्र सरकारने भरमसाट वाढ केली आहे. त्याचा फटका हातावर पोट भरणाऱ्या गरीब रिक्षा-टॅक्सीचालकांना बसत आहे. त्यामुळे त्यांच्यासह अन्य भरडल्या जाणाऱ्या वाहतूकदारांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. केंद्र सरकारच्या जाचक अटींतून सुटका व्हावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही, अशा संतप्त भावना यावेळी वाहतूकदारांनी व्यक्त केल्या. ‘ओला’, ‘उबेर’ कॅबसारख्या खाजगी वाहतूकदारांची जोरदार स्पर्धा सुरू आहे. भविष्यात आणखी स्पर्धकांची भर पडणार आहे. त्यामुळे व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले. निदर्शने, आंदोलनानंतर केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी आणि राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही पेणकर यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)रिक्षाचालकांना सुनावले खडेबोलअन्य वाहतूकदारांच्या स्पर्धेत होत असलेल्या नुक सानीला आपणही जबाबदार असल्याचे खडेबोल यावेळी महासंघाचे अध्यक्ष पेणकर यांनी रिक्षाचालकांना सुनावले. अवास्तवपणे घेतल्या जाणाऱ्या भाडेवसुलीबाबतही रिक्षाचालकांचे कान टोचण्यात आले. लोकल ट्रेन बंद पडल्यावर कशाप्रकारे भाडे वसूल केले जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
वाहतूकदारांची ३१ ला ‘आरटीओ’वर निदर्शने
By admin | Published: January 29, 2017 3:01 AM