उल्हासनगर : शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचे संकेत महापालिकेने दिल्याने, शहरातील वाहतूक सुसाट होणार आहे. गेल्या महिन्यात ५५४ कोटीचा उड्डाणपूल बांधण्याचा प्रकल्प अहवाल महापालिकेने एमएमआरडीएला पाठविल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली.
उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्तासह इतर दोन ते तीन रस्त्याचा अपवाद सोडल्यास बहुतांश रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या उभी ठाकली आहे. कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्ता १०० फुटी असूनही वाहन संख्या जास्त असल्याने, वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. शहरातील वाहतूक सुसाट होण्यासाठी एमएमआरडीएने या रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचा (डीपीआर) प्रकल्प अहवाल महापालिकेकडून मागविला होता. त्यानुसार आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे व शहर अभियंता संदीप जाधव यांच्या संकल्पनेतून गेल्या महिन्यात ५५४ कोटी ५१ लाखाचा सविस्तर प्रकल्प अहवाल एमएमआरडीएला पाठविला आहे. एमएमआरडीएने उड्डाणपुलाच्या प्रकल्प अहवालाला मान्यता दिल्यास, नवीन वर्षात उड्डाणपुलाच्या कामाला सुरू होणार असल्याचे संकेत शहर अभियंता जाधव यांनी दिले.
शहरातील कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल झाल्यास, बाहेरून येणारी वाहने थेट उड्डाणपूलाद्वारे शहराबाहेर जाणार असल्याने, वाहतूक कोंडी होणार नाही. असे शहर अभियंता जाधव यांचे म्हणणे आहे. देशात सर्वाधिक घनतेचे शहर म्हणून उल्हासनगरची ओळख असून क्षेत्रफळाच्या प्रमाणात वाहनाची संख्या जास्त आहे. मात्र वाहनांच्या प्रमाणात रस्ते अरुंद असल्याने, वाहतूक कोंडी समस्या निर्माण झाली. कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल उभा राहिल्यास वाहतूक समस्या निकाली निघणार असल्याचे आयुक्त अजीज शेख यांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त एमएमआरडीएने शहरातील एकून ७ मुख्य रस्ते बांधणीला गेल्या वर्षी मंजुरी दिली. त्यासाठी १५० कोटींची तरतूद आहे. मात्र अध्यापही रस्त्याच्या कामाला सुरूवात झाले नसल्याने, आरोप प्रत्यारोप होत आहे.
शहर विकास आराखड्याला मूठमाती शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शहर विकास आराखड्यानुसार विकास कामे केले जातात. मात्र याला उल्हासनगर अपवाद आहे. एकून ७ रस्त्यासाठी १५० कोटीचा निधी मंजूर आहे. मात्र रस्ते डीपीनुसार होण्याऐवजी रस्ता जसा आहे, त्यानुसार बांधण्याचा महापालिकेने संकेत दिले. त्यामुळे भविष्यात शहर कसे असेल? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.