ठाणे : आधीच शहराच्या विविध भागात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या वाहतुक बदलांमुळे ठाणेकर वाहतुक कोंडीने मेटाकुटीला आला आहे. अशातच शनिवारी सकाळ पासूनच ठाणेकरांना वाहतुक कोंडी सामना करावा लागला. मुंब्रा बायपास येथे केमिकलचा टँकर पलटी हून झालेला अपघात, भिवंडी येथे पावसाने पडलेले खड्डे आणि गणेशोत्सव जवळ आल्याने बाप्पाच्या गाड्या देखील भिवंडी मार्गाने जात होत्या. या गाड्या धिम्या गतीने जात असल्याने त्याचा परिणाम देखील वाहतुकीवर झाल्याचे दिसून आले.
नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीवर त्यामुळे परिणाम झाला. परंतु वाहनांच्या रांगा थेट घोडबंदर मार्गापर्यंत गेल्या होत्या. दुसरीकडे शहरातील काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा देखील कोलमडून पडल्याने दुपारच्या सत्रात अंतर्गत भागातही वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. घोडबंदर मार्गांवर बोरीवलीच्या दिशेने जाणाºया मार्गिकेवर मेट्रोचे काम सुरु आहे. याचा फटका येथून जाणाºया वाहनाना बसून त्यांचा वेग मंदवला आहे. त्यातही गणेशउत्सवाच्या निमित्ताने मोठया मंडळानी त्यांच्या मूर्त्या आणण्यासाठी शनिवारी प्राधान्य दिले. मोठया मुर्ती असलेले ट्रक हळू जात असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला गेला होता. याकारणाने घोडबंदर हुन ठाण्याच्या दिशेने तसेच ठाण्याहून भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने साकेत पूल ते माजिवडा नाक्यापासून अगदी तीन हात नाक्या पर्यंत वाहतूक कोंडीत अडकली होती.
भिवंडी येथे बॉम्बे ढाबा येथे पावसाने खड्डे पडल्याने वाहनांचा वेग मंदवला होता. शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास मुंब्रा बायपास रोड, चर्नी पाडा, कौसा, या ठिकाणी वन साईड ढाबा जवळ ठाण्याकडून मुंब्राकडे जाणाºया रस्त्यावर सल्फ्युरिक अॅसिड घेऊन जाणारा टँकर पलटी झाला होता. त्यामुळे देखील मुंब्रा- ठाणे रोडवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. या ठिकाणी टँकर पलटी झाल्यामुळे टँकर मधून केमिकलचा धूर व उग्र वास येत होता. नाल्यामध्ये पलटी झालेला टँकर टेक्नोवा कंपनीचे केमिकल तज्ञ , आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी व मुंब्रा पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने बाजूला करण्याचे काम केले. या वाहतूक कोंडीत रिक्षा आणि ठाणे परिवहन सेवेच्या बस, बेस्ट च्या बस अडकल्याने कामावर जाणाºया चाकरमान्यांचे हाल झाले. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस ही वाहतुल कोंडी सोडवताना दिसून आले. दुसरीकडे शहरातील काही भागात सिग्नल यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे देखील शहरातील अनेक अंतर्गत भागात वाहतुक कोंडी झाली होती.
मुंब्रा बायपास येथे झालेला अपघात, भिवंडी येथे पावसाने पडलेले खड्डे आणि मोठ्या मंडळाच्या गणपतीचे आगमन झाल्याने वाहनांचा वेग मंदवला गेला होता. त्याचा परिणाम म्हणून ठाणे शहरात वाहतुक कोंडी झाली होती. -डॉ. विनयकुमार राठोड - वाहतुक पोलीस उपायुक्त, ठाणे शहर