ठाणे: ठाणे शहरातील मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूलावरील खडयांमुळे बुधवारी सलग सातव्या दिवशीही ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागत होता. त्यात काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे कामही हाती घेण्यात आल्यामुळे या कोंडीमध्ये आणखीनच भर पडल्याचे चित्र पहायला मिळाले.
शहरात वारंवार होणाºया वाहतूक कोंडीमुळे ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी मुंबईच्या वाहतूक विभागाचे सल्लागार डॉ. विश्वनाथ केळकर तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाब उगले आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे आदींनी मंगळवारी आनंदनगर चेक नाका ते खारेगाव टोलनाका या मार्गावर वाहतूकीचा आॅन फिल्ड आढावा घेतला. यात खड्डयांसह आणखी कोणती कारणे या कोंडीमागे आहेत? याचीही मीमांसा करण्यात आली. लवकरच या मार्गावरील काही भाग नो पार्किंग झोन म्हणून घोषित केला जाणार आहे.
साकेत पूल ते ठाण्यातील आनंदनगर जकातनाका तसेच भिवंडीतील रांजनोली नाका आणि घोडंबर मार्गावरील मानपाडापर्यंत बुधवारी सकाळपासून वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीत अत्यावश्यक सेवांचीही वाहने अडकली होती. सकाळी ९ ते दुपारी ३ नंतरही वाहतूक कोंडी कायम होती. काही ठिकाणी अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरासाठी दीड ते दोन तासांचा अवधी लागत होती. कूर्म गतीने वाहतूक सुरु असतांनाच माजीवडा नाक्यावर काही ठिकाणी रस्त्यांमधील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित यंत्रणांनी भर पावसामध्ये हाती घेतले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडली होती. या काळात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी तसेच मदतनीस यांची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचे पहायला मिळाले.
मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल हा अरुंद असून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्याचा परिणाम या मार्गावरून वाहतूक करणाºया वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. बुधवारी या कोंडीचा मोठा फटका प्रवाशांना बसला. मुंबई नाशिक महामार्गावर ठाण्याहून नाशिक, भिवंडीच्या दिशेने वाहतूक करणाºया मार्गिकेवर साकेत पूल ते मुंबई ठाण्याच्या सीमेवरील आनंदनगर जकातनाक्यापर्यंत ही कोंडी पहायला मिळाली. या कोंडीमुळे सकाळी काही काळ अवजड वाहनांची वाहतूक या मार्गांवरुन बंद केली होती. त्यामुळे दुपारी काही काळ वाहन चालकांची या कोंडीतून सुटका झाली होती.