लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहरातील मुख्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शहराच्या विविध भागांत वाहतूक कोंडीचा ताप वाहनचालकांना सहन करावा लागत असल्याचे शनिवारी दिसून आले. त्यात साकेत उड्डाणपुलाखालीच ट्रक बंद पडल्याने या वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली. त्यामुळे तीन हात नाका ते नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
ठाण्यात धड पाऊस झाला नसताना खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. साकेत मार्गावर आधीच खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असताना शनिवारी ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या रांगा थेट तीन हात नाक्यापर्यंत लागल्याचे दिसून आले. हा ट्रक मार्गातून हटवण्यासाठी पाऊण तासाचा कालावधी गेल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांनी अगोदरच वाहतूक धीमी केली होती. आठ दिवसांपूर्वीच या मार्गावरील खड्डे तात्पुरता मुलामा करून बुजवण्यात आले होते; परंतु पाऊस पडताच हा मुलामा वाहून गेला. यासंदर्भात ठाणे वाहतूक पोलिसांच्या वतीने एमएसआरडीसी, बांधकाम विभाग तसेच इतर प्राधिकरणांसोबत पत्रव्यवहार करण्यात आला; परंतु खड्डे बुजवण्यात चालढकल केली जाते.
शहरातील मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोल नाका ते कॅडबरी जंक्शन, कशेळी-काल्हेर, कोपरी पूल आणि शिळ फाटा भागात रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतुकीचा वेग मंदावून गेले काही दिवस वाहतूक कोंडी होत आहे. दुपारी ४ नंतर या मार्गांवर कोंडी असल्याचे चित्र नैमित्तिक झाले आहे. यामुळे अवघ्या पाच मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांवर २० ते २५ मिनिटे लागतात. अनेकांना कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही.
.............
महामार्गावर खड्डे पडल्याने तसेच अचानक ट्रक बंद पडल्याने येथे वाहतूक कोंडी झाली होती. ट्रक बाजूला काढण्यात येऊन, कोंडी सोडविण्यात आली. खड्डे बुजविण्यासाठी संबंधित यंत्रणेसोबत पत्रव्यवहार केला आहे.
- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग ठाणे
............